Posts

अजून ठरायचंय!

  माझा आवडता पदार्थ मला कुणी विचारला की मला खरोखरच भंजाळायला होतं , कारण असा एक पदार्थ सांगणं अशक्य आहे. मला अन्नच मुळी मनापासून आवडतं. ते प्रेमानं करणारे , खाणारे , खिलवणारे , अन्नासोबतचं आपलं बरंवाईट नातं समजून घेणारे लोक आपले वाटतात.   मैत्रिणीच्या आईबाबांपासून ते सहकारिणींपर्यंत आणि आईच्या मित्रांपासून ते दूरदेशातल्या कधी न पाहिलेल्या मित्रांपर्यंत किती जणांनी माझ्या रसनेचे लाड पुरवले आहेत नि मी हौसेनं-हक्कानं पुरवून घेतले आहेत. कितीतरी वेळा जीव खाऊन संतापायला जागा सापडत नसताना , रडूही येत नाही अशा कासावीस वेळांना कुणीतरी प्रेमानं काहीतरी खाऊ घातलं इतक्याच गोष्टीनं शांत वाटलं आहे मला. अनेकदा बटाट्याच्या वा तांदुळाच्या अत्यंत स्निग्ध-खारट अवताराचं निव्वळ ' स्ट्रेस इटिंग ' करून शांत होऊन झोपले आहे. अनेकदा तगमगून हॉटेलांतून एकटीनंच जाऊन पोटभर खाल्लं आहे. क्वचित ' हो , एकटीच बसून नीट जेवणारे , प्रॉब्लेम ?' असा उर्मट आविर्भाव अंगभर लेऊन जेवले आहे ; बरेचदा आपण काही जगावेगळं करतोय असं अजिबात न वाटता , सहज वेटरच्या प्रेमानं खिलवण्याला दाद देत जेवल्ये. किती वेळा जीव ओतून स

कुळथाचंं पिठलं

कुळथाच्या पिठल्यावर चकार शब्दही न काढता त्याला न्याय देण्यासाठीच तोंड उघडणं हाच त्याचा योग्य तो सन्मान असेल , अशी कबुली देऊन मगच मी त्याबद्दल चार शब्द बोलणार आहे. दुपारच्या जेवणाला , पाहुण्यांची सरबराई करण्याकरता , खास मेजवानीकरता करण्याचा हा पदार्थ नव्हे. घरचीच माणसं असताना , प्रचंड दमणूक झालेली असताना , पण भूकही तितकीच लागलेली असताना , ' आता आपल्याला पिठलंभात मिळणारे बरं का , सोस थोडं ' असं गाजर स्वतःला दाखवत रात्रीच्या जेवणासाठी रांधायचा नि चापायचा हा पदार्थ आहे. तो दिसायला आकर्षक नाही. काळसर-तपकिरी जाड द्राव. लोखंडाच्या खोल तव्यात वा ॲल्युमिनियमच्या जाड बुडाच्या कढईत रांधायचा.   नीट मंद आचेवर खमंग भाजून , भरडून , पाखडून दळलेल्या कुळथाचं पीठ विनासायास मिळण्याइतके नि ते राखण्याइतके भाग्यवान नि धोरणी तुम्ही असाल , तर तुमच्याकडे ती हाताला रेशमी लागणारी गुलबट रंगाची पिठी असते. त्यात घालायला रसरशीत आमसुलं असतात. आणि मुख्य म्हणजे लसूण असते. ठेचून   फोडणीत लाल केलेली लसूण , सुकी मिरची , वरून पाण्यात आमसुलं नि मग कालवून ओतलेलं पीठ. रटरटू द्यायचं. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर म्हणजे च

अंंबाडीचं सूप

 अंबाडीची भाजी माझ्या प्रचंड आवडीची.  तुरीची डाळ, चिकट तांदुळाच्या कण्या, भिजलेले शेंगदाणे हे सगळं नि अंबाडीचा पाला एकत्र शिजवून घ्यायचा. मग पावभाजीच्या चेपणीनं चेपून हे सगळं - शेंगदाणे वगळता - चांगलं एकजीव करायचं. भरपूर तेलात लसणीच्या पाकळ्या कुरकुरीत करून घेऊन फोडणी करायची हिंग-मोहरी-हळदीची. वरून लाल तिखट आणि शिवाय सुक्या मिरच्या. या फोडणीवर अंबाडीचं गरगट घालायचं नि मस्त उकळायची. किंचित गूळ, आंबटपणाला कोपरखळी देईल इतकाच. मीठ.  ही भाजी कितीही खाल्ली तरी पोट भरल्यासारखं वाटतच नाही. वजन कमी करताना पंचाईत होते पण. हा सगळा ऐवज घातलेली भाजी हाणली, की कार्ब-कटिंगचाही बोर्‍या वाजतो नि तेलाकडून फॅट्सचाही. म्हणून एक प्रयोग करून पाहिला. अंबाडीचा पाला शिजवून घेतला. शिजल्यावर वाटीभर होईल इतका पाला. दोन चमचे तुरीची डाळ नि दोन चमचे तांदूळ भिजत घातले. सहा-सात तास ते भिजल्यावर पाणी काढून टाकलं. मग तो शिजलेला पाला नि भिजलेले डाळतांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतले गंधासारखे बा....रीक. पेस्ट तयार झाली. त्यात तीन फुलपात्रं भरून पाणी घातलं. मीठ घातलं. गुळाचा बारीकसा खडा घातला. उकळत ठेवलं प्रकरण. मध्ये मध्ये नी

हार्डवेअर आणि मी

माझं स्वतःचं स्वैपाकघर मांडून ते मोडायची वेळ येईस्तो मला लोकांचे त्यांच्या स्वैपाकघरातल्या भांड्यांशी असलेले संबंध कळतच नसत. ‘टिपिकल बायकी चाळे’ अशा असंवेदनशील लेबलाखाली ते जमा करून मी मोकळी होत असे. पण माझं स्वतंत्र स्वैपाकघर मांडताना खरेदी केलेली भांडी आकाशवाणीच्या स्वैपाकघरात विलीन करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र माझ्यातल्या अलग्नित सासुरवाशिणीनं फणा काढला. “मला नाही तुझा भीमझारा आवडत. जरा अटकर भांडी वापरली तर लगेच एफिशियंसी कमी होते का काय तुझी?” हे माझ्या बाजूनी, तर “एवढ्याएवढ्याश्या भांड्यात कसं गं करता? साधं नीट ढवळता येत नाही खालपासून. अडस होतं ते. नि मग माझ्या शेगडीवर हीSS सांडलवंड...” अशी आकाशवाणी. तोवरच्या चममकींमध्येही ‘तुझा भीमझारा’ आणि ‘माझी शेगडी’ यांसारखे स्वामित्वदर्शक सर्वनामांचे प्रयोग झाले असणारच. पण तेव्हा मात्र मला एकदम साक्षात्कार झाला – आपण बायकी-बायकी म्हणून मोडीत टाकत आलो त्या प्रकरणाचा किडा आपल्यालाही चावलाय की! मग मी एक यादीच करायला घेतली. उत्तपे नि आंबोळ्या उलटताना उलथनं आत जातं, पण बाहेर येताना त्याच्या पात्याची मागची चौकोनी धार लागून घावनाचा कोथळा

द्रौपदीची थाळी

Image
माणसाला ज्या-ज्या कामांमध्ये मदतनीस न लाभणे म्हणजे त्याला गतजन्मीचं घोर पाप भोवणे   असं मला मनापासून वाटतं ,  त्यांत कपड्यांना इस्त्री करणे या कामाच्या खालोखाल पालेभाज्या निवडणे या कामाचा नंबर लागतो. काय तो चविष्ट अन्नप्रकार नि काय त्याच्या सेवनाची ती महाकंटाळवाणी पूर्वतयारी. किती म्हणून विरोधाभास असावा ? (आता मी मंडईतल्या ताज्या नि हिरव्यागार भाज्यांची वर्णनं खपवून पाचपन्नास शब्द घुसडणार आहे   असा कुणाचा समज असल्यास सबूर.) मला भाज्या खरेदी करण्याची आवड नाही. मला त्यातलं फारसं कळतही नाही. तत्संबंधी सुगरणीला शोभणारे काही शेलके सल्ले देऊन मी माझ्यापाशी नसलेल्या जाणकारीचा पुरावा देऊ शकीन. उदाहरणार्थ ,  मेथीची पानं जाडसर ,  रसरशीत ,  कडांना गुलबट झाक असलेली बघून घ्यावीत किंवा कोथिंबिरीला फुलं आलेली दिसली की तिच्या पानांचा वास पार झोपलेला असतो ,  त्यामुळे अशी कोथिंबीर अज्याबात उचलू नये. पण हे सल्ले आकाशवाणीच्या कृपेने मला तोंडपाठ आहेत ,  त्यामागे अनुभवसिद्धता नाही ,  ही कबुली मी देऊ इच्छिते. मंडई – च्यायला ,  मंडई-मंडई काय लावलंय हे मी मघापासून ?  मी पुण्याची किंवा गेला बाजार डोंबिवल

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी. आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच. पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे. पण नाही आवडत मला पोळीची चव. फाशी देणार आहात? द्या. तरीही बाणेदारपणे हेच्च सांगीन. मला पोळी आवडत नाही. हरितक्रांतीनंतर शिरजोर होऊन बसलेल्या कणीक या फ्याशनेबल अर्वाचीन पदार्थाचा वास, पोत, चव, रंग यांतलं काहीच मला प्रिय नाही. कणीक भिजवायला घेतल्या-घेतल्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर त्या पिठाला एक प्रकारचा उबदारपणा आणि मग सूक्ष्म बुळबुळीतपणा येतो, तिथपासून ते तव्यावरची पोळी उलटताना पोळीतून कणकेच्या वाफेचा एक भपकारा येतो, तिथपर्यंत. कोण ते, ग्लूटेन ग्लूटेन म्हणून ओरडतंय? वैज्ञानिक स्पष्टीकरण गेलं गाढवाच्या गावात.

फेण्या

Image
फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे. 'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं असतं हे आकाशवाणी जाणून असल्यामुळे ते वाक्य हवेतच विरतं. कुरकुरवाक्याला जन्म देणारी बोरही बाभळीच्याच गावची असल्यामुळे ती अजिबात खचून जात नाही. रागरंग, वातावरणातला दाब, तापमान, हवामान, वार्‍याची दिशा, मूड, वेळवखत आणि आसमंतातून मिळू शकणारा पाठिंबा पाहून पुन्हा एकदा, पण या खेपेला थोड्या ठाम आवाजात, त्याच वाक्याची डिलिवरी केली जाते. "बरेच दिवसांत फेण्या नाही झाल्या." (या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तरंगती तीन टिंबं नाहीत, प्लीज नोट.) टायमिंग जमून आलेलं असेल (घरातल्या सगळ्यांना रविवार सकाळ मोकळी असणे आणि अशी रविवार सकाळ बरोब्बर तीन-चार दिवसांच्या अंतरावर उभी असणे) तर वातावरणातून दुजोरा मिळतो आणि गाडी, 'किती तांदूळ भिजत टाकू?' या प्रश्नावर सरकते. हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे, लक्षात घ