Posts

Showing posts from 2019

द्रौपदीची थाळी

Image
माणसाला ज्या-ज्या कामांमध्ये मदतनीस न लाभणे म्हणजे त्याला गतजन्मीचं घोर पाप भोवणे   असं मला मनापासून वाटतं ,  त्यांत कपड्यांना इस्त्री करणे या कामाच्या खालोखाल पालेभाज्या निवडणे या कामाचा नंबर लागतो. काय तो चविष्ट अन्नप्रकार नि काय त्याच्या सेवनाची ती महाकंटाळवाणी पूर्वतयारी. किती म्हणून विरोधाभास असावा ? (आता मी मंडईतल्या ताज्या नि हिरव्यागार भाज्यांची वर्णनं खपवून पाचपन्नास शब्द घुसडणार आहे   असा कुणाचा समज असल्यास सबूर.) मला भाज्या खरेदी करण्याची आवड नाही. मला त्यातलं फारसं कळतही नाही. तत्संबंधी सुगरणीला शोभणारे काही शेलके सल्ले देऊन मी माझ्यापाशी नसलेल्या जाणकारीचा पुरावा देऊ शकीन. उदाहरणार्थ ,  मेथीची पानं जाडसर ,  रसरशीत ,  कडांना गुलबट झाक असलेली बघून घ्यावीत किंवा कोथिंबिरीला फुलं आलेली दिसली की तिच्या पानांचा वास पार झोपलेला असतो ,  त्यामुळे अशी कोथिंबीर अज्याबात उचलू नये. पण हे सल्ले आकाशवाणीच्या कृपेने मला तोंडपाठ आहेत ,  त्यामागे अनुभवसिद्धता नाही ,  ही कबुली मी देऊ इच्छिते. मंडई – च्यायला ,  मंडई-मंडई काय लावलंय हे मी मघापासून ?  मी पुण्याची किंवा गेला बाजार डोंबिवल