Posts

Showing posts from 2017

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी. आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच. पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे. पण नाही आवडत मला पोळीची चव. फाशी देणार आहात? द्या. तरीही बाणेदारपणे हेच्च सांगीन. मला पोळी आवडत नाही. हरितक्रांतीनंतर शिरजोर होऊन बसलेल्या कणीक या फ्याशनेबल अर्वाचीन पदार्थाचा वास, पोत, चव, रंग यांतलं काहीच मला प्रिय नाही. कणीक भिजवायला घेतल्या-घेतल्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर त्या पिठाला एक प्रकारचा उबदारपणा आणि मग सूक्ष्म बुळबुळीतपणा येतो, तिथपासून ते तव्यावरची पोळी उलटताना पोळीतून कणकेच्या वाफेचा एक भपकारा येतो, तिथपर्यंत. कोण ते, ग्लूटेन ग्लूटेन म्हणून ओरडतंय? वैज्ञानिक स्पष्टीकरण गेलं गाढवाच्या गावात.