फराळ आणि मी

खरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे. "आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...", "मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...", किंवा "हसायलाच लागल्या नं ग चकल्या! मग सऽऽगळं बाजूला ठेवून पर्रत आधण ओतलं भाजणीवर. पहाटेचे चार वाजले चकल्या हो व्हायला. पण मी हार मानली नै..."मधली हौतात्म्याची हौस मला काही केल्या कळतच नसे. हापिसातून येऊन, स्वैपाक उरकून वर हे घाणे घालायचे. त्यात हमखास यशाची हमी क्वचित. ’चकल्या पोटात मऊ राहतायत की काय’ नि तत्सम धास्ती प्रत्येकीच्या पोटात. बरं, पदार्थ तरी एकमार्गी होण्यातले आहेत? भाजण्या भाजा (”चंगली मंद आचेवर खमंग भाज बाई!"), "कणकेवर घालू नकोस रे, चिकट होईल पीठ" असल्या बजावण्या देऊन त्या दळून आणा, पोहे भाजा किंवा तळा, बेसन भाजा, पाक करा, पिठं भिजवा, फोडण्या करा, मसाले करा, खोबरं, खसखस, डाळं, काजू, शेंगदाणे, बेदाणे... नाना तर्हा. इतका सगळा कुटाणा करून पदार्थ नीट होण्याची ग्यारण्टी नाही ती नाही. फेकून मारण्याजोगे...