पोहे आणि मी
रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता? बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर भरत नाहीच. शिवाय पित्ताला आमंत्रण. आणि खरं सांगायचं तर काही खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. अशा वेळी मी हमखास पोह्यांचा आश्रय घेते. पोहे पुरेश्या दुधात भिजवावेत. साय असल्यास उत्तम. त्यावर पोह्यांच्या साधारण एक द्वितीयांश तरी दही घालावं. चवीपुरतं मीठ आणि तवंगासकट फोडणीची मिरची / लसणीचं तिखट / तळलेली सांडगी मिरची किंवा मग चक्क लाल तिखट. चमच्यानं किंवा हातानं. आपापल्या मगदुरानुसार कालवावेत. आणि ओरपावेत. परब्रह्म. सकाळी सिंकमधे पडलेली खरकटी वाटी / कुंड्या / पातेलं बघून आईची दणदणीत हाक आलीच पाहिजे - जागलात वाटतं काल? उठा आता महाराणी... दहीपोहे हा निव्वळ रात्रीच्या उपाशी जागरणांशी असोसिएट केलेला पदार्थ नसून माझ्या बाबांच्या वात्सल्याशीही तो निगडीत आहे. बर्याचदा संध्याकाळी बाहेरून गिळून आल्यावर 'हॅ, मला नाहीये...