Posts

Showing posts from July 5, 2015

फेण्या

Image
फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे. 'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं असतं हे आकाशवाणी जाणून असल्यामुळे ते वाक्य हवेतच विरतं. कुरकुरवाक्याला जन्म देणारी बोरही बाभळीच्याच गावची असल्यामुळे ती अजिबात खचून जात नाही. रागरंग, वातावरणातला दाब, तापमान, हवामान, वार्‍याची दिशा, मूड, वेळवखत आणि आसमंतातून मिळू शकणारा पाठिंबा पाहून पुन्हा एकदा, पण या खेपेला थोड्या ठाम आवाजात, त्याच वाक्याची डिलिवरी केली जाते. "बरेच दिवसांत फेण्या नाही झाल्या." (या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तरंगती तीन टिंबं नाहीत, प्लीज नोट.) टायमिंग जमून आलेलं असेल (घरातल्या सगळ्यांना रविवार सकाळ मोकळी असणे आणि अशी रविवार सकाळ बरोब्बर तीन-चार दिवसांच्या अंतरावर उभी असणे) तर वातावरणातून दुजोरा मिळतो आणि गाडी, 'किती तांदूळ भिजत टाकू?' या प्रश्नावर सरकते. हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे, लक्षात घ