श्रीखंड यहीं बनाएँगे
वास्तविक गोड पदार्थांमध्ये मला सर्वांत जास्त कुठला पदार्थ आवडतो, हा एक यक्षप्रश्न आहे. म्हणजे मला गूळतूप ते रसमलाई, बर्फी ते मोदक (काजू मोदक वगळून! तो प्रकार माझ्या डोक्यात जातो.), फणसपोळी ते पुरणपोळी सर्व तितकेच प्रिय आहेत. त्यामुळे ह्या पदार्थाबद्दल लिहिताना त्याला नेमकं काय विशेषण द्यावं मला कळेना. म्हणजे "हा की नई माझा सर्वांत आवडता गोड पदार्थ आहे", असं काही गोऽड मला म्हणवेना. त्याहून काही कडू म्हणणं यथोचित होईना. नि उगीच काहीतरी म्हणावं असं काहीही सुचेना. म्हणजे थोडक्यात लेखाची काहीही रूढार्थाने आकर्षक, पुणेरी नियमांत बसणारी विनोदी किंवा अगदीच नवनीत निवडक निबंधछाप अशी प्रस्तावना म्हणून खरडायची चार वाक्य काही केल्या सुचेनात. त्यामुळे अशा रडकुंडीला आलेल्या क्षणी मला ह्या पदार्थाचं "दाटून कंठ येता" असं एक समर्पक वर्णन तेवढं सुचलं. आता ह्या मिस्टर कॉन्टिनेन्टल पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास तो घशाशी येतो, हा काही त्या पदार्थाचा अवगुण नव्हे. त्याला तसे मिट्ट गोड बनविणार्यांचा त्यात दोष आहे. पण म्हणून अगदीच जड हाताने साखर घालणे हा काही त्यावर उपाय नव्हे. किंबहुन...