साबुदाण्याची खिचडी
परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला. अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?" 'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं. माझ्याकडे दाण्याचं कूटपण असतं,' असलं काहीतरी प्रामाणिक प्रॅक्टिकल उत्तर द्यावं ना? पण नाही. मस्ती. 'अय्या, तुम्ही उपास नै करत चतुर्थीला?' ऐकावं लागलं. मग मलापण चेवच चढला. मान्य आहे, असेल बिचारी चतुर्थी-बोडण-चतुर्मास पंथातली, तर उगीच मूर्तिभंजनाचं काही कारण नव्हतं. पण एक तर मला ऑफर न करता खिचडी खातेय आणि वर ही जुर्रत? शी आस्क्ड फॉर इट, यू नो? हिरवी चटणी भरलेलं पापलेट, बांगड्याचं कालवण, काळ्या मसाल्यातलं चिकन... इथपासून सुरुवात करून मी 'ससापण ट्राय करून पाहिलाय मी, फार नाही वेगळा लागत. मोर खाल्ला होता एकदा चंद्रपूरला गेले होते तेव्हा. तू खाल्लायस?'पर्यंत मजल मारली आणि तिच्या खिचडीचं यथाशक्ती वाट्टोळं केलं. 'खातेय मी, जरा गप बसायला काय घेशील?' हे स्पष्ट छापलं होतं त...