द्रौपदीची थाळी
माणसाला ज्या-ज्या कामांमध्ये मदतनीस न लाभणे म्हणजे त्याला गतजन्मीचं घोर
पाप भोवणे असं मला
मनापासून वाटतं, त्यांत
कपड्यांना इस्त्री करणे या कामाच्या खालोखाल पालेभाज्या निवडणे या कामाचा नंबर
लागतो. काय तो चविष्ट अन्नप्रकार नि काय त्याच्या सेवनाची ती महाकंटाळवाणी
पूर्वतयारी. किती म्हणून विरोधाभास असावा?
(आता मी मंडईतल्या ताज्या नि हिरव्यागार भाज्यांची वर्णनं खपवून पाचपन्नास
शब्द घुसडणार आहे असा कुणाचा समज
असल्यास सबूर.) मला भाज्या खरेदी करण्याची आवड नाही. मला त्यातलं फारसं कळतही
नाही. तत्संबंधी सुगरणीला शोभणारे काही शेलके सल्ले देऊन मी माझ्यापाशी नसलेल्या
जाणकारीचा पुरावा देऊ शकीन. उदाहरणार्थ, मेथीची पानं
जाडसर, रसरशीत, कडांना गुलबट झाक असलेली बघून घ्यावीत किंवा कोथिंबिरीला फुलं आलेली दिसली
की तिच्या पानांचा वास पार झोपलेला असतो, त्यामुळे अशी
कोथिंबीर अज्याबात उचलू नये. पण हे सल्ले आकाशवाणीच्या कृपेने मला तोंडपाठ आहेत, त्यामागे अनुभवसिद्धता नाही, ही कबुली मी देऊ
इच्छिते. मंडई – च्यायला, मंडई-मंडई काय
लावलंय हे मी मघापासून? मी पुण्याची
किंवा गेला बाजार डोंबिवलीची आहे असा दुर्लौकिक पसरण्याच्या आत सावरू दे मला, मार्केट – हा एक त्रासदायक प्रकार असतो. तिथे मांडलेल्या हिरव्यागार भाज्या
नि रसरशीत लिंबू-टमाटे-मिरच्या कितीही फोटूजनिक दिसत असल्या, तरी महाराष्ट्रातल्या यच्चयावत भाजीवाल्यांना असलेल्या आपल्या भाज्यांचा
कचरा रस्त्याच्या बरोबर मध्ये आणून ठेवण्याच्या, रस्त्यावरच्या वाहनांच्या दडपणाखाली चिरडून त्याची लहानलहान टेंगळं
करण्याच्या, नि रस्ता
उटणटवळा नि चिखलराडयुक्त करण्याच्या सवयींमुळे तिथे एक विशिष्ट वास परमाळत असतो.
तो मला आवडत नाही. भाजीवाले आणि भाजीवाल्या – उगाच लिंगविशिष्ट हेत्वारोप नकोत –
अत्यंत इरसाल जमात असून समोरच्या बाईला भाज्या ओळखताही येत नाहीत, त्यांची पाककृती ठाऊक असणं नि त्यांतलं बरंवाईट कळणं तर लांबच राहिलं अशी
त्यांची खातरी असते नि ती लपवण्याचा ते जराही प्रयत्न करत नाहीत. बरं, आपण आपल्या अज्ञानाला शरण जाऊन ‘ही कुठली भाजी
मामी?’ असं नम्रपणाचा
आव आणून विचारलं किंवा हिशेबात एखाद्दुसर्या रुपयाचा घोळ केला, की तत्काळ ‘काय ताई...!’ असं म्हणून
छद्मी हसू भिरकावण्यात येतं. त्यानं आपला आत्मविश्वास आणिकच ढासळतो. बरं, घरी जाऊन ‘देई वाणी घेई प्राणी आहेस अगदी! कुणावर गेल्येस...’ अशी एका दगडात तीनचार पक्षी ठार करणारी आकाशवाणी होणारच असते. असो. तर
थोडक्यात – पालेभाज्यांच्या खरेदीतलं मला काहीही कळत नाही. दुसरा अतिमहत्त्वाचा तापदायक
भाग म्हणजे पालेभाज्या निवडणे. याबद्दल काय बोलावे? त्याहून मी मेंदी सात वेळा गाळून घेईन, इतकं म्हणणं पुरेसं आहे. हे एकसुरी का काय ते काम करताना आपली सर्जनशील
ताकद परजत विचार करू शकणार्या आणि त्यामुळे हे काम आवडणार्या सर्व
प्राणिमात्रांना माझा विनम्र नमस्कार आहे. मला पालेभाजी निवडून मिळाली, तरच मी ती रांधू आणि खाऊ शकीन.
पण इथून पुढे मात्र मजा असते, हे मान्य केलं
पाहिजे.
मेथीदाणे फोडणीस घालून गरगट शिजवलेला अळू नि चिंचगूळ घालून केलेली पातळ
भाजी. ठेचलेल्या
लसणीवर तिखट्ट मिरच्या नि उभा चिरलेला कांदा घालून त्यावर न चिरता घातलेली मेथीची
कोवळी पानं नि वरून दाण्याचं कूट. हिरव्या मिरच्या नि आलेलसणीच्या खरड्यावर
भिजवलेली मुगाची डाळ नि मुळ्याचा ताजा पाला नि वरून सढळ हस्ते शिवरलेलं ओलं खोबरं.
फोडणीत लाल मिरच्या ठसकवून त्यावर कांदेबटाटे नि मेथी समप्रमाणात घालून घरभर
सुटलेला घमघमाट. फोडणीत मेथीदाणे, लाल सुक्या
मिरच्या नि बचकभर लसणी घालून त्यावर घातलेली कोवळी चवळई. पानात वाढताना हिच्यावर
थंडगार दही घातलेलं. तुरीच्या डाळीसोबत माठाचा पाला शिजवून घ्यायचा. फोडणीत लसूण
नि लाल तिखट घालायचं. त्यात शिजलेल्या आठिळा नि आंबटपणाला कैरी. ती नसलीच, तर आंबोशी. वरून तो माठ नि तूरडाळीचा लगदा. आमटीहून किंचित घट्ट नि
पेंडपाल्याहून बरंच सैल. परब्रह्म. चणाडाळ भिजवून किंचित चरबरीत वाटून घेतलेली.
फोडणीत लसूण-मिरचीची गोळी नि चिरलेला शेपू. वाफेवर तो शिजला की ती वाटलेली चणाडाळ.
वाढल्यावरून वरून किंचित गोडंतेल. शिजवून घोटलेली तूरडाळ नि तांदूळकण्या, मेथीदाणे नि शेंगदाणे, लाल मिरच्या नि
लसूण यांच्या साथीनं शिजलेली अंबाडी. हिलाही वरून हिंगाच्या चरचरीत फोडणीचं तेल
किंवा निदान गोडंतेल तरी. पालक त्या मानानं बावळट. पण तोही भरपूर मिरच्यालसणींच्या
जोडीनं हळद अजिबात न घालता परतला की खुलून येतो. ताकातल्या भाज्यांचं निराळंच
डिपार्मेंट. भिजवलेले नि लोण्याहून किंचित अलीकडच्या पायरीवर शिजवलेले डाळ दाणे, ताक, आळणाला
मूठचिमूटभर बेसन, मीठ-साखर, मिरच्या नि ठसकेबाज कढीपत्त्याची फोडणी, त्यात शिजवलेला चाकवत किंवा पालक किंवा अळू. भिजवून कोळलेली चिंच नि
गरगटलेला अळू लसणीच्या फोडणीवर घालून त्यात डाळकण्या मिसळून केलेली अळूची गोळा
भाजी. तिलाही कुरकुरीत तळल्या गेलेल्या लाल मिरच्या असतील, तर रंगत अधिक. तेल जरा वरकड घेऊन बारीक चिरून मऊ शिजवलेली कांद्याची पात.
भरपूर कांदा नि भरपूर ओलं खोबरं यांच्या साथीनं खुलून येणारी खमंग मेथी. वर्षाकाठी
एकदाच मिळणारी नि चवीत किंचित कडसर झाक असलेली भारंगीची कतरी-कतरी पानं. ती शिजवून
निथळून घ्यायची नि भिजवलेल्या वालांवर फोडणीस घालायची. शिजली की वरून भाजणी पेरून
कोरडी करायची...
तरी मी अजून मेनस्ट्रीम कलाकारांबद्दलच बोलत्ये. फोडशी, भोपळ्याची पानं नि
टाकळ्यासारख्या पावसाळी रानभाज्या,
‘चातुर्मास’फेम केनीकुर्डू, खोबरेल तेलावर शिजवायचा शेवग्याचा कोवळा पाला, आंबाडीच्या पाल्याचं लोणचं,
‘श्यामची आई’फेम रताळ्याच्या
पाल्याची भाजी, वालाच्या
बिरड्यांच्या कोवळ्या पाल्याची भाजी, रेती धुता धुता
नाकीनऊ आणणारी पण शिजवल्यावर त्या श्रमांचं सार्थक करणारी समुद्रमेथी… अशा अनवट मंडळींबद्दल बोलायला बसलो, तर झालंच.
पालेभाज्यांबद्दल इतक्या प्रेमानं बोलताना मला कायम द्रौपदीच्या त्या
थाळीची गोष्ट आठवते. ‘घासलेल्या थाळीला भाजीचं पान चिकटून तसंच राहिलं, मग कसली आल्ये द्रौपदी सुगृहिणी? जरा पाचांना
कामाला लावायचंस की बये! ’ हा मूर्तिभंजक शेरा गिळून माझं लक्ष्य जात राहतं, ते ते चिकटलेलं पान काढून खाण्याचा मोह न टाळू शकणार्या कृष्णाकडे. त्या
पानानं त्याचं पोट भरलं यात कसला आलंय कर्माचं देवत्व. रानातल्या कोवळ्या
पाल्याच्या भाज्या असणारच तितक्या जब्बर चवीच्या, असं वाटतं.
आंबट चुक्याची पानं, थोडा पालक नि
थोडा माठ घालून केलेला हा पेंडपाला या पोस्टच्या सांगतेसाठी.

फोडणीत कढीपत्ता नि मिरच्या परतून त्यावर सगळा पाला बारीक चिरून वाफवला. वरून शिजवलेल्या तूरडाळीचा नि मूगडाळीचा गोळा घातला. दाण्याचं कूट. नि यंदाच्या ‘सरस’मध्ये हाती लागलेलं जबराट चवीचं काळं तिखट.

फोडणीत कढीपत्ता नि मिरच्या परतून त्यावर सगळा पाला बारीक चिरून वाफवला. वरून शिजवलेल्या तूरडाळीचा नि मूगडाळीचा गोळा घातला. दाण्याचं कूट. नि यंदाच्या ‘सरस’मध्ये हाती लागलेलं जबराट चवीचं काळं तिखट.
गरम भाकरी, पांढरा कांदा, ताजं ताक नि हे प्रकरण.
फक्त ती भाजी निवडण्याकरता मात्र आकाशवाणीला शरण जाणं भाग असतं, इतकंच काय ते.
Comments