अजून ठरायचंय!

 माझा आवडता पदार्थ मला कुणी विचारला की मला खरोखरच भंजाळायला होतं, कारण असा एक पदार्थ सांगणं अशक्य आहे. मला अन्नच मुळी मनापासून आवडतं. ते प्रेमानं करणारे, खाणारे, खिलवणारे, अन्नासोबतचं आपलं बरंवाईट नातं समजून घेणारे लोक आपले वाटतात. 

मैत्रिणीच्या आईबाबांपासून ते सहकारिणींपर्यंत आणि आईच्या मित्रांपासून ते दूरदेशातल्या कधी न पाहिलेल्या मित्रांपर्यंत किती जणांनी माझ्या रसनेचे लाड पुरवले आहेत नि मी हौसेनं-हक्कानं पुरवून घेतले आहेत. कितीतरी वेळा जीव खाऊन संतापायला जागा सापडत नसताना, रडूही येत नाही अशा कासावीस वेळांना कुणीतरी प्रेमानं काहीतरी खाऊ घातलं इतक्याच गोष्टीनं शांत वाटलं आहे मला. अनेकदा बटाट्याच्या वा तांदुळाच्या अत्यंत स्निग्ध-खारट अवताराचं निव्वळ 'स्ट्रेस इटिंग' करून शांत होऊन झोपले आहे. अनेकदा तगमगून हॉटेलांतून एकटीनंच जाऊन पोटभर खाल्लं आहे. क्वचित 'हो, एकटीच बसून नीट जेवणारे, प्रॉब्लेम?' असा उर्मट आविर्भाव अंगभर लेऊन जेवले आहे; बरेचदा आपण काही जगावेगळं करतोय असं अजिबात न वाटता, सहज वेटरच्या प्रेमानं खिलवण्याला दाद देत जेवल्ये. किती वेळा जीव ओतून स्वैपाक केलाय नि तर्री त्यातलं काहीबाही बिघडल्यावर खाणाऱ्यांसोबत खांदे उडवून, हसत-खुशालत जेवल्ये. आपल्याला जमून गेलेल्या चवीला मिळालेली खाणाऱ्याच्या नजरेतली दाद बघून मनोमन तृप्तावले आहे. कधी आपणच दिलेली जेवणामंत्रणं विसरून पाहुणा दारात दत्त म्हणून उभा राहिल्यावर झटपट स्वैपाक केलाय. कधी प्रयोग. कधी हातखंडा प्रयोग. कधी कुणा जिवाजवळच्या माणसाच्या घरची याद थोडी कमी दुखरी होईल अशा अंदाजानं रांधलेलं काही. कधी निव्वळ पाककौशल्याची चूष. 

'आमच्यात अस्सं नसतं बॉ' असं म्हणणाऱ्या - मग ते कुठल्याही फॉर्ममध्ये नि कुणीही म्हटलेलं असू शकतं, तथाकथित 'हेल्दी' खाण्याचा माज असणाऱ्यानं म्हटलेलं, वा तथाकथित 'उच्चवर्णीय' खाण्याचा माज असणाऱ्यानं म्हटलेलंही - कुणाच्याही बोलण्यानं मला चिडायला झालं आहे कायम. 'अनहेल्दी' हे, अर्थदृष्ट्याही ठार गचाळ विशेषण अन्नाला लावणारे लोक मी तत्काळ शत्रुपक्षात टाकत आलेय. तसेही ते स्वकर्तृत्वानं लवकरच तिकडे जातात हे अनुभवलंय! सोशल मिडियावरची अत्युच्चमध्यमवर्गीय अन्नसूज बघून चिडचिड झाली आहे माझीही, नाही असं नाही. पण त्यातली - म्हणजे चिडचिडीतली! - अप्रगल्भताही सुदैवानं लक्ष्यात आलीय. गरिबी आणि त्यातून येणारी भूक मी अनुभवलेली नाही. पण त्या भुकांबद्दल संवेदनशीलता बाळगूनही, आपल्या आयुष्यात अभाव होता, म्हणून आपल्याला इतरांच्या अन्नविषयक सवयींचा अपमान करण्याचा हक्क आहे असं मानणाऱ्यांची कीव केलीय मनोमन. अशा लोकांबद्दल कीव न वाटता करुणा वाटेल, तेव्हा बहुधा माझी उत्क्रांती पूर्ण होईल.

त्या दिवशी काय खाऊन नि पिऊन आनंद साजरा करायचा? अजून ठरायचंय!

 

Comments

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे