कुळथाचंं पिठलं

कुळथाच्या पिठल्यावर चकार शब्दही न काढता त्याला न्याय देण्यासाठीच तोंड उघडणं हाच त्याचा योग्य तो सन्मान असेल, अशी कबुली देऊन मगच मी त्याबद्दल चार शब्द बोलणार आहे. दुपारच्या जेवणाला, पाहुण्यांची सरबराई करण्याकरता, खास मेजवानीकरता करण्याचा हा पदार्थ नव्हे. घरचीच माणसं असताना, प्रचंड दमणूक झालेली असताना, पण भूकही तितकीच लागलेली असताना, 'आता आपल्याला पिठलंभात मिळणारे बरं का, सोस थोडं' असं गाजर स्वतःला दाखवत रात्रीच्या जेवणासाठी रांधायचा नि चापायचा हा पदार्थ आहे. तो दिसायला आकर्षक नाही. काळसर-तपकिरी जाड द्राव. लोखंडाच्या खोल तव्यात वा ॲल्युमिनियमच्या जाड बुडाच्या कढईत रांधायचा. 

नीट मंद आचेवर खमंग भाजून, भरडून, पाखडून दळलेल्या कुळथाचं पीठ विनासायास मिळण्याइतके नि ते राखण्याइतके भाग्यवान नि धोरणी तुम्ही असाल, तर तुमच्याकडे ती हाताला रेशमी लागणारी गुलबट रंगाची पिठी असते. त्यात घालायला रसरशीत आमसुलं असतात. आणि मुख्य म्हणजे लसूण असते. ठेचून  फोडणीत लाल केलेली लसूण, सुकी मिरची, वरून पाण्यात आमसुलं नि मग कालवून ओतलेलं पीठ. रटरटू द्यायचं. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर म्हणजे चैनीची परमावधी. सोबत भात मात्र मोकळा नको. शितानं शिताला घातलेली मिठी सहजी सुटता नये. पहिल्या वाफेचा हवा शिवाय. थोडं, निदान वासनाफजितीपुरतंतरी तूप - तुपाचा थेंब - हवा. दह्याची कवडी, पांढरा कांदा, आणि पोह्याचा पापड असेल, तर संपलंच. आणि हो, पानात पिठलं. वाटीत नाही. ते गोळ्यासारखं एका ठिकाणी लपकन पडता कामा नये, तसंच आतुरतेनं मिठाकडे धावत निघताही नव्हे. हे जमलं तर पिठल्याचा पोत जमला. 

हे सगळं जमून आलं तर माणसं ओरपून जेवतात. नंतर पिठलं चाटून खातात. कढईच्या कडेला जमा झालेली, पिठल्याची खरपूस साय खरवडून खातात. दमणूक विसरून पानावरच हात वाळवत गप्पा मारत बसतात. भरल्या पोटानं शांत झोपतात. हे मिळण्यासाठी नशीब लागतं. पाककृती, पाककौशल्य, घटकपदार्थ, इत्यादी बेगड लावून सजवण्याचं हे अन्न नव्हे.

 

Comments

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे