अंंबाडीचं सूप
अंबाडीची भाजी माझ्या प्रचंड आवडीची.
तुरीची डाळ, चिकट तांदुळाच्या कण्या, भिजलेले शेंगदाणे हे सगळं नि अंबाडीचा पाला एकत्र शिजवून घ्यायचा. मग पावभाजीच्या चेपणीनं चेपून हे सगळं - शेंगदाणे वगळता - चांगलं एकजीव करायचं. भरपूर तेलात लसणीच्या पाकळ्या कुरकुरीत करून घेऊन फोडणी करायची हिंग-मोहरी-हळदीची. वरून लाल तिखट आणि शिवाय सुक्या मिरच्या. या फोडणीवर अंबाडीचं गरगट घालायचं नि मस्त उकळायची. किंचित गूळ, आंबटपणाला कोपरखळी देईल इतकाच. मीठ.
ही भाजी कितीही खाल्ली तरी पोट भरल्यासारखं वाटतच नाही.
वजन कमी करताना पंचाईत होते पण. हा सगळा ऐवज घातलेली भाजी हाणली, की कार्ब-कटिंगचाही बोर्या वाजतो नि तेलाकडून फॅट्सचाही. म्हणून एक प्रयोग करून पाहिला. अंबाडीचा पाला शिजवून घेतला. शिजल्यावर वाटीभर होईल इतका पाला. दोन चमचे तुरीची डाळ नि दोन चमचे तांदूळ भिजत घातले. सहा-सात तास ते भिजल्यावर पाणी काढून टाकलं. मग तो शिजलेला पाला नि भिजलेले डाळतांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतले गंधासारखे बा....रीक. पेस्ट तयार झाली. त्यात तीन फुलपात्रं भरून पाणी घातलं. मीठ घातलं. गुळाचा बारीकसा खडा घातला. उकळत ठेवलं प्रकरण. मध्ये मध्ये नीट तळापासून ढवळायचं मात्र लक्ष्यात ठेवायला लागणार आहे. कारण ते तळाशी लागायला वेळ लागत नाही, तांदूळ शिजायला लागला की. चव बघून मीठ-गूळ अॅड्जस्ट करून घ्यायचं अंबाडीच्या आंबटपणानुसार. नि मग लसणीच्या पाकळ्यांच्या पातळ चकत्या अर्धा चमचा तेलात भाजायच्या. जरा लालसर व्हायला लागल्या की मेथीचे तीन दाणे घालायचे. मेथी लाल होईस्तो, लसणीच्या चकत्या चिवट-कुरकुरीत व्हायला लागतात. मग नखभर मोहरी, त्याहून कमी हिंग, हळद. वरून चिली फ्लेक्स. उकळणार्या सुपावर लाल तिखटाची चिमटी घालायची नि त्याला सूपसमाधी मिळायच्या आत वरून ती मिनि-फोडणी ओतायची. गॅस बंद.
मेंदीच्या रंगाचं सूप, वरून चिली फ्लेक्स नि सोनेरी लसणी. बरं, हे नुसतं दिसण्याचं वर्णन झालं. अंबाडीच्या पाल्याचा रानवट वास लसणीमुळे झाकला जातो. चव हुबेहूब अंबाडीच्या भाजीची येते. आणि शिवाय कर्बोदकं नि स्निग्धांश कमी.
एन्जॉय!
Comments