हार्डवेअर आणि मी

माझं स्वतःचं स्वैपाकघर मांडून ते मोडायची वेळ येईस्तो मला लोकांचे त्यांच्या स्वैपाकघरातल्या भांड्यांशी असलेले संबंध कळतच नसत. ‘टिपिकल बायकी चाळे’ अशा असंवेदनशील लेबलाखाली ते जमा करून मी मोकळी होत असे. पण माझं स्वतंत्र स्वैपाकघर मांडताना खरेदी केलेली भांडी आकाशवाणीच्या स्वैपाकघरात विलीन करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र माझ्यातल्या अलग्नित सासुरवाशिणीनं फणा काढला. “मला नाही तुझा भीमझारा आवडत. जरा अटकर भांडी वापरली तर लगेच एफिशियंसी कमी होते का काय तुझी?” हे माझ्या बाजूनी, तर “एवढ्याएवढ्याश्या भांड्यात कसं गं करता? साधं नीट ढवळता येत नाही खालपासून. अडस होतं ते. नि मग माझ्या शेगडीवर हीSS सांडलवंड...” अशी आकाशवाणी. तोवरच्या चममकींमध्येही ‘तुझा भीमझारा’ आणि ‘माझी शेगडी’ यांसारखे स्वामित्वदर्शक सर्वनामांचे प्रयोग झाले असणारच. पण तेव्हा मात्र मला एकदम साक्षात्कार झाला – आपण बायकी-बायकी म्हणून मोडीत टाकत आलो त्या प्रकरणाचा किडा आपल्यालाही चावलाय की!

मग मी एक यादीच करायला घेतली.

उत्तपे नि आंबोळ्या उलटताना उलथनं आत जातं, पण बाहेर येताना त्याच्या पात्याची मागची चौकोनी धार लागून घावनाचा कोथळा निघतो. म्हणून हौसेनं पात्याचं बूड गोलाकार असेलसं बघून आणलेला कालथा. दांडी चिमुकली आहे त्याची, पण मला आवडते ती.

बिडाचा तवा. आकाशवाणीच्याच मैत्रिणींनी अगदी आयता वळसवून दिलेला. पण तिला निर्लेप हौस असल्यामुळे मागे राहिलेला. मी तो माझ्या अखत्यारीत वापरायला काढला. भयंकर वजनदार आणि पहिलं धिरडं हमखास करणारणीला घाम फोडणारं. पण एकदा तापला की तापला! माझ्या एका जुन्या कंपनीतल्या लॅपटॉपसारखा. सुरू व्हायला वेळ घेईल. पण Once it is up, you don’t need to worry. एकदम मख्खन.

आमच्या बदललेल्या घरांच्या एका बदलीच्या काळात नव्या घरी गेलो, तर ओट्यावर राहिलेली एक ताटली. पण गुजराथी थाळे असतात, थेट तसे असलेली. आकार मात्र अटकर. कुणाची असेल काय ठाऊक असं नाक मुरडतच ती घासली. आकार आवडतो म्हणून ती कधीतरी झाकणबिकण ठेवायला वापरली, ती हळूहळू घरचीच झाली. ती वास्तविक जमिनीवर ठेवली तर गोलगोल फिरते, नीट बूड टेकून बसत नाही. पण मन गुंतलंच आहे तिच्यात.

‘सासरहून काही म्हणता काही आलेलं नाही माझ्या संसारात.’ असा, माझ्याकडे बघून पण बाबांच्या दिशेनं मारलेला बाण दुर्लक्षून मला कायम दिसत राहिलेलं पितळी कातणं. नातीला हौस, म्हणून आजीनं मुद्दाम तिला दिलेलं. त्या कातण्याचं चाक नक्षीदार आहे नि न अडता सुळसुळीतपणे फिरतं. वर मागे टोकदार चमचा. अगदी डाळ-ढोकळीतल्या ढोकळ्या कापायलाही तेच हुडकून घ्यायला मला आवडतं, ते उगाच नव्हे.

तसंच पाणी तापवायचं ते विशिष्ट आकाराचं तपेलं. तेही बाबांच्या माहेरचंच. आमच्याकडे वॉशिंग मशीन आणि गीझरही नव्हता त्या काळात पावसाळ्यात आंघोळीसाठी पाणी तापत ठेवल्यावर आमच्या चड्ड्याही बाबा त्या तपेल्याला गुंडाळून ठेवायचे नि आंघोळीला जाताना ‘कोरडा पंचा नि गरमागरम चड्डी...’ असा पुकारा व्हायचा. आता पाणी तापवायला लागत नाही, तरी काय झालं? तपेलं आहेच! कधीकधी हुक्की आल्यावर (‘हीSS एवढी चिंच नासून!’) ते झक्क घासायचं. मग ते आतला तांबूस रंग झळकवून दाखवतं.

सत्तरीतल्या हिंदी सिनेमातल्या नायकाची आई ज्या प्रकारच्या अ‍ॅल्युमिनियमच्या शंभर पोचे आलेल्या पातेल्यात खडखड आवाज करत अन्न संपल्याचं करुण पार्श्वसंगीतासह जाहीर करत असे, थेट तसल्या पातेल्याचा धाकटा भाऊ शोभेलसं आणि घरबदलीच्या एका आवराआवरीत माझ्या हाती आलेलं एक पातेलं. त्याचा एकूण झोपडपट्टी अवतार बघून मी हॅहॅत्कार केलेला. पण ‘टाकायचंय ना हे?’ अशी विचारणा केली असता बाबांच्या चेहर्‍यावर क्षणभर द्विधा दिसली. म्हणून खोदून खोदून विचारलं. तर ते पातेलं, बाबा या महाशहरात नोकरीच्या शोधासाठी नव्यानंच दाखल झालेले असताना खरेदी केलेल्या पहिल्या बॅचचं पासाउट निघालं! मग ते राहिलं ते राहिलंच. त्याचा एकूण अवतार बघता त्यात स्वैपाक घडत नाही; पण ते टाकायचंही नाही, यावर आता अलिखित शिक्कामोर्तब आहे.

एका बोहारणीकडून घेतलेलं ठोक्याचं तसराळं. तितकं दणकट आणि तशा आकाराचं नि प्रकाराचं दुसरं भांडं मला अजून दिसलेलं नाही. शिवाय त्याच्या खरेदीचा किस्साही खास. आकाशवाणी घरात नसताना आलेली तिची बोहारीण घरातल्या आजीच्या फोटोकडे बघून एकदम दचकली आणि ‘ताईंचं असं... मला काय पत्त्याच न्हाई... मी गेल्या साली आलेली नं...’ वगैरे कसनुश्या आवाजात बोलायला लागली, तेव्हा उर्वरित तीन चतुर्थांश घराला काही कळेचना. तितक्यात ‘अरे! किती महिन्यांनी!’ अशी आकाशवाणी झाली आणि बोहारीण ‘ताईंच्या आई व्ह्य... मी तरी मेली... ’ असं पुटपुटत भांडी दाखवायला लागली. मग यथास्थित ‘काढा की अजून ताई... बघा, भाऊंचे शर्ट असतील... ‘ वगैरे घासाघीस होऊन ते तसराळं आमच्याकडे रुजू झालं. ते आल्यापासून कणकेला परात वापरलेली नाही.

टप्परवेअरच्या आगमनापूर्वी खास द्रवपदार्थासाठी आत्यानी कौतुकानं घेतलेली लहानशी किटली जरा कुणाकडे काही देण्याघेण्यासाठी गेली, तर ती वाईट दिसेलसा पुणेरीपणा करून ती आठवणीनी मागून घेतली जाते...

आजी पाणी प्यायला वापरायची ते बरणीच्या आकाराचं, पण स्टीलचं, झाकण असलेलं भांडं. ते आता मामीच्या घरात नुसतं बघूनही कसलासा धागा जुळल्यासारखा वाटतो...

मैत्रिणीनं चार-साडेचार किलोंचं ओझं वाहून कोल्हापुरातून आणलेला, आतून कड नसलेला, गोलाकार पितळी खलबत्ताच साधं चहाचं आलं ठेचायलाही वापरला जातो...

जुन्या चाळीत मागील दारच्या कडीत अडणा म्हणून अडकवून ठेवलेल्या लांब लोखंडी दांड्याच्या पळीसारखी पळी हुडकत नजर अजुनी भांड्यांच्या बाजारात भिरभिरत राहते...

यादी संपेचना.

निगुतीनं नि प्रेमानं स्वैपाकघर वापरणार्‍या एका मित्रासोबत नव्या घराच्या भांड्याकुंड्यांची खरेदी करायला म्हणून उन्हातान्हात हिंडताना, “ही सुरी नको, पातं संपतं तिथे नीट घासता येणार नाही. मग काळी होते...” असं सुगरपणे म्हणून त्याला ती सुरी नापसंत केलेलं पाहिलं आणि नि या सुगरपणाच्या बदल्यात ‘प्लीज चहा टाकतेस?’ची त्याची कायमची फर्माईश ‘नॉनपुरुषी’ म्हणून पास करून टाकली.

Comments

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे