अजून ठरायचंय!
माझा आवडता पदार्थ मला कुणी विचारला की मला खरोखरच भंजाळायला होतं , कारण असा एक पदार्थ सांगणं अशक्य आहे. मला अन्नच मुळी मनापासून आवडतं. ते प्रेमानं करणारे , खाणारे , खिलवणारे , अन्नासोबतचं आपलं बरंवाईट नातं समजून घेणारे लोक आपले वाटतात. मैत्रिणीच्या आईबाबांपासून ते सहकारिणींपर्यंत आणि आईच्या मित्रांपासून ते दूरदेशातल्या कधी न पाहिलेल्या मित्रांपर्यंत किती जणांनी माझ्या रसनेचे लाड पुरवले आहेत नि मी हौसेनं-हक्कानं पुरवून घेतले आहेत. कितीतरी वेळा जीव खाऊन संतापायला जागा सापडत नसताना , रडूही येत नाही अशा कासावीस वेळांना कुणीतरी प्रेमानं काहीतरी खाऊ घातलं इतक्याच गोष्टीनं शांत वाटलं आहे मला. अनेकदा बटाट्याच्या वा तांदुळाच्या अत्यंत स्निग्ध-खारट अवताराचं निव्वळ ' स्ट्रेस इटिंग ' करून शांत होऊन झोपले आहे. अनेकदा तगमगून हॉटेलांतून एकटीनंच जाऊन पोटभर खाल्लं आहे. क्वचित ' हो , एकटीच बसून नीट जेवणारे , प्रॉब्लेम ?' असा उर्मट आविर्भाव अंगभर लेऊन जेवले आहे ; बरेचदा आपण काही जगावेगळं करतोय असं अजिबात न वाटता , सहज वेटरच्या प्रेमानं खिलवण्याला दाद देत जेवल्ये. किती वेळा जीव ओतून स