Posts

फेण्या

Image
फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे.

'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं असतं हे आकाशवाणी जाणून असल्यामुळे ते वाक्य हवेतच विरतं. कुरकुरवाक्याला जन्म देणारी बोरही बाभळीच्याच गावची असल्यामुळे ती अजिबात खचून जात नाही. रागरंग, वातावरणातला दाब, तापमान, हवामान, वार्‍याची दिशा, मूड, वेळवखत आणि आसमंतातून मिळू शकणारा पाठिंबा पाहून पुन्हा एकदा, पण या खेपेला थोड्या ठाम आवाजात, त्याच वाक्याची डिलिवरी केली जाते. "बरेच दिवसांत फेण्या नाही झाल्या." (या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तरंगती तीन टिंबं नाहीत, प्लीज नोट.) टायमिंग जमून आलेलं असेल (घरातल्या सगळ्यांना रविवार सकाळ मोकळी असणे आणि अशी रविवार सकाळ बरोब्बर तीन-चार दिवसांच्या अंतरावर उभी असणे) तर वातावरणातून दुजोरा मिळतो आणि गाडी, 'किती तांदूळ भिजत टाकू?' या प्रश्नावर सरकते.

हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे, लक्षात घ्या. …

व्यायामशाळा आणि कॅलर्‍या

वैधानिक इशारा : वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा माणूस दिसला रे दिसला, की काही लोक विनोदाच्या अपेक्षेनं आधीच खुळचटासारखे खिदळायला लागतात. हा लेख वाचणार्‍यांत असे नग असतील, तर त्यांनी माझा नमस्कार स्वीकारून ओसरीवरूनच तातडीनं निघण्याचं करावं. किलो आणि कॅलर्‍या'मध्ये तुम्हांला विनोदसापडणार नाही, करुणरसपरिपोष आणि कटोविकटीचा संताप तेवढा सापडेल.
ट्रॅफिकजॅममधून रखडत-पेंगत मी अंधार-उजेडाच्या सीमेवर कशीबशी ऑफिसातून घरी पोचले आहे. जिमला जाण्याचा जामानिमा घाईघाईत करून उपाशीपोटी जिम गाठलंय. वॉर्मअप, उड्या-धावपळ, आणि मग स्ट्रेचेस् असा पुरेसा त्रास देहाला दिला आहे. धन्य धन्य वाटतंय. त्याच आनंदाच्या लाटेवर तरंगत मी अन्नविषयक सल्लागाराला भेटले आहे. हा आमचा संवाद.
सल्लागारः काय काय खाता तुम्ही रोज? (मी आधी प्रचंड खजील होते. आपण दिवसभरातून किती वेळा चहा-कॉफ्या ढोसतो आणि काय-काय चरबीयुक्त गोष्टी ओरपतो याचा हिशोब या माणसाला प्रामाणिकपणे द्यायचा या कल्पनेनं सटपटायला होतं. पण आता आलोच आहे तर होऊन जाऊ द्या, म्हणून सगळा पाढा वाचते. काय वाटेल ते वाटेल साल्याला. गेला उडत.)
सल्लागारः बरं. (बरंच काय काय कागदावर …

फराळ आणि मी

Image
खरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे.

"आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...",
"मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...",
किंवा
"हसायलाच लागल्या नं ग चकल्या! मग सऽऽगळं बाजूला ठेवून पर्रत आधण ओतलं भाजणीवर. पहाटेचे चार वाजले चकल्या हो व्हायला. पण मी हार मानली नै..."मधली हौतात्म्याची हौस मला काही केल्या कळतच नसे. हापिसातून येऊन, स्वैपाक उरकून वर हे घाणे घालायचे. त्यात हमखास यशाची हमी क्वचित. ’चकल्या पोटात मऊ राहतायत की काय’ नि तत्सम धास्ती प्रत्येकीच्या पोटात. बरं, पदार्थ तरी एकमार्गी होण्यातले आहेत? भाजण्या भाजा (”चंगली मंद आचेवर खमंग भाज बाई!"), "कणकेवर घालू नकोस रे, चिकट होईल पीठ" असल्या बजावण्या देऊन त्या दळून आणा, पोहे भाजा किंवा तळा, बेसन भाजा, पाक करा, पिठं भिजवा, फोडण्या करा, मसाले करा, खोबरं, खसखस, डाळं, काजू, शेंगदाणे, बेदाणे... नाना तर्‍हा. इतका सगळा कुटाणा करून पदार्थ नीट होण्याची ग्यारण्टी नाही ती नाही. फेकून मारण्याजोगे लाडू…

पोहे आणि मी

रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता?
बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर भरत नाहीच. शिवाय पित्ताला आमंत्रण. आणि खरं सांगायचं तर काही खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. अशा वेळी मी हमखास पोह्यांचा आश्रय घेते.
पोहे पुरेश्या दुधात भिजवावेत. साय असल्यास उत्तम. त्यावर पोह्यांच्या साधारण एक द्वितीयांश तरी दही घालावं. चवीपुरतं मीठ आणि तवंगासकट फोडणीची मिरची / लसणीचं तिखट / तळलेली सांडगी मिरची किंवा मग चक्क लाल तिखट. चमच्यानं किंवा हातानं. आपापल्या मगदुरानुसार कालवावेत. आणि ओरपावेत. परब्रह्म.
सकाळी सिंकमधे पडलेली खरकटी वाटी / कुंड्या / पातेलं बघून आईची दणदणीत हाक आलीच पाहिजे - जागलात वाटतं काल? उठा आता महाराणी...
दहीपोहे हा निव्वळ रात्रीच्या उपाशी जागरणांशी असोसिएट केलेला पदार्थ नसून माझ्या बाबांच्या वात्सल्याशीही तो निगडीत आहे. बर्‍याचदा संध्याकाळी बाहेरून गिळून आल्यावर 'हॅ, मला नाहीये…

डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक. मशीनमधली कितवीतरी कॉफी घेतानाही 'साखरेचा क्यूब टाकू की नको' असा धाक आणि मोहाच्या सीमारेषेवरचा प्रश्न दर वेळी. सामोशाच्या काउंटरवरून अंमळ चिडचिड करतच स्वतःला फ्रुट बोलच्या नीरस-नॉन ग्लॅमरस पर्यायाकडे वळवणं. काळोख पसरायला लागायच्या वेळी ऐन रहदारीच्या रस्त्यावरून परतताना घराचं कुलूप काढण्यासाठी स्वतःला एनकरेज करत, वाटेवरच्या लायब्ररीचं लॉलिपॉप दाखवत दाखवत जाणं.

'अमेरिकन लेज्' आणि तत्सम इझी कम्फर्ट एस्केप्सच्या जाळ्यात सापडण्याची हीच नेमकी वेळ.

त्या दिवशी मात्र चाळा म्हणून रस्ता थोडा बदलला तर भाजीवाल्यांची एक अलीबाबा-गुहाच समोर आल्यासारखी झाली.

उच्चमध्यमवर्गीयांच्या वस्तीत असतात तसली मोनोपॉलीनं माजलेली, महागडी, ब्रोकोली + पालक + टोमॅटो + कोबी + फरसबी इतपतच माना टाकलेले पर्याय असल…

मिसळपाव

Image
मोठ्ठ्या ब्रेकनंतर काही अपडेट्सः
१. क्ष ला काही विशिष्ट व्यक्तिविशेषांमधे असाधारण रुची निर्माण झाल्यामुळे तो भल्या पहाटे उठून ब्रेकफास्टकरिताही एक विशिष्ट हाटेल गाठू लागला आहे. त्यामुळे आमच्या स्वैपाघरातला त्याचा सक्रिय / निष्क्रिय सहभाग जवळपास बंद झाल्यात जमा आहे.
२. स्वैपाघरातील दिने दिने धाडसी प्रयोगांचा आम्हांला (अर्थात! आत्मवाचक आदरार्थी बहुवचन.) वीट आल्यामुळे आम्ही चक्क एक 'कुकबुवा' बाळगला आहे. त्याचं नाव र. (नुकताच लॉण्ड्रीतून आलेला हातरुमाल पोळ्या शेकायला घेणे व तो हातासरशी थोडासा जाळून ठेवणे, महिन्याकाठी निदान तीन तरी दांड्या मारणे, सांगितल्यापैकी अर्धाच स्वयंपाक करून कुणाचे लक्ष नाहीसे पाहून साळसूदपणे पसार होणे, कुठलीही भाजी असो - त्यात एक कांदा, बरीचशी धनिया पावडर व एखादा तरी टमाटू जिरवणे (अत्यंत तुच्छ स्वरात - टमाटर हेल्थके लिये अच्छा होता मॅडम...), उशिरा उगवल्यावर व पैसे उसने मागताना अनन्यसाधारण गोड हसून दाखवणे, अशा अनेक लीला तो लीलया करतो. पण त्याबद्दल सविस्तर परत कधीतरी. तूर्तास नुसताच पात्रपरिचय.)
३. र येऊ लागल्यानंतर सुमारे आठ दिवसांतच मी, अ आणि ब यांची पोटं आळ…

श्रीखंड यहीं बनाएँगे

Image
वास्तविक गोड पदार्थांमध्ये मला सर्वांत जास्त कुठला पदार्थ आवडतो, हा एक यक्षप्रश्न आहे. म्हणजे मला गूळतूप ते रसमलाई, बर्फी ते मोदक (काजू मोदक वगळून! तो प्रकार माझ्या डोक्यात जातो.), फणसपोळी ते पुरणपोळी सर्व तितकेच प्रिय आहेत. त्यामुळे ह्या पदार्थाबद्दल लिहिताना त्याला नेमकं काय विशेषण द्यावं मला कळेना. म्हणजे "हा की नई माझा सर्वांत आवडता गोड पदार्थ आहे", असं काही गोऽड मला म्हणवेना. त्याहून काही कडू म्हणणं यथोचित होईना. नि उगीच काहीतरी म्हणावं असं काहीही सुचेना. म्हणजे थोडक्यात लेखाची काहीही रूढार्थाने आकर्षक, पुणेरी नियमांत बसणारी विनोदी किंवा अगदीच नवनीत निवडक निबंधछाप अशी प्रस्तावना म्हणून खरडायची चार वाक्य काही केल्या सुचेनात. त्यामुळे अशा रडकुंडीला आलेल्या क्षणी मला ह्या पदार्थाचं "दाटून कंठ येता" असं एक समर्पक वर्णन तेवढं सुचलं. आता ह्या मिस्टर कॉन्टिनेन्टल पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास तो घशाशी येतो, हा काही त्या पदार्थाचा अवगुण नव्हे. त्याला तसे मिट्ट गोड बनविणार्‍यांचा त्यात दोष आहे. पण म्हणून अगदीच जड हाताने साखर घालणे हा काही त्यावर उपाय नव्हे. किंबहु…