...ऊर्फ सुगरणीचा सल्ला!


काही कबुल्या:

१) खाण्यापिण्यावर लिहिणं ही काही माझी वरिजनल आयडिया नव्हे. अशीच भटकंती करताना काही झकास फूड ब्लॉग्स मिळाले. अशीही मला 'रुचिरा' टाईपची पुस्तकं वाचायचा छंद आहेच. त्याच चालीवर हे ब्लॉग्स मनापासून वाचले.
'कुठलीही खाद्यसंस्कृती सर्वश्रेष्ठ नसते.
एका खाद्यसंस्कृतीवर प्रेम करताना दुसरीला कदापि कमी लेखायचं नाही.
नीट माहीत करून घ्यायचं, करून पाहायचं, खाऊन पाहायचं आणि जबाबदारीनं - त्या संस्कृतीच्या परंपरेची जाणीव ठेवून - मगच जीभ टाळ्याला लावायची.
खरीखुरी चव हॉटेलात कधीच पुरती गावत नाही, तिच्या पुरतं पोटात शिरायचं असेल - तर कुण्या गृहिणीचा गुरुमंत्र घ्यावा लागतो.
हे 'झट मंगनी पट ब्याह' कामही नव्हे. ही साधना आहे...'
हे तिथले अलिखित संकेत होते - आहेत. ते मला जबराट आवडले.
सुदैवानं-दुर्दैवानं स्वैपाकाच्या प्रांतात हात-पाय हलवण्याचं काम सध्या माझ्या गळ्यात पडलं आहे. तिथले काही अफलातून - काही भीषण अनुभव पोटात खदखदत होतेच. म्हणून मग (मुख्यत्वे नुपूरच्या ब्लॉगमुळे) हिय्या केला. अर्थात ती (आणि इतर बरेच जण. वेळोवेळी त्यांचा सादर उल्लेख करीनच!) या प्रांतात 'दादा' आहे. तिच्याइतकं कौशल्य तर सोडाच, तिच्याइतकं सातत्य जरी मला जमलं, तरी मी धन्य होईन!
खरं तर इथे फोटोची सर्वाधिक गरज. पण माझा क्यामेरा तूर्तास माझ्याजवळ नाही आणि लोकांनी काढलेले फोटू छापण्यात काही मजा नाही. त्यामुळे आमची भिस्त शब्दांवरच. :(

२) हस्ताक्षरावरून म्हणे माणसाची मनःस्थिती, त्याचा स्वभाव, त्याची पार्श्वभूमी कळते. याचाच उपयोग काही चतुर डॉक्टर पेशंटची मनःस्थिती बदलण्यासाठी करून घेतात. हीच थिअरी मी या लिखाणाच्या बाबतीत वापरून पाहणार आहे. (असाही सगळ्या उदासपणावर खाणे-पिणे हा एक अक्सीर इलाज असल्याचं मी मानतेच!) बघू या माझा 'दु:खी-आत्ममग्न-एकसुरी' कंटाळा-मूड बदलता येतो का!
अर्थात हा एक प्रयोग आहे. त्यामुळे तूर्तास तरी त्याला काही ठरावीक साचा नाही, शिस्तही नाही. आकार तर नाहीच नाही. 'उदरभरण' हा एकमात्र रस्ता. त्याच्या काठाकाठानं जमेल तेवढं रानोमाळ भटकायचं. :)

३) 'माझे स्वैपाकाचे प्रयोग' (आहाहा, कसलं नैतिक आणि धाडसी वाटतं!) माझे एकटीचे असले, तरी मला देवानं चांगली दोन (टुणटुणीत, नाठाळ आणि तिखट जीभ असलेली) गिनिपिग्ज दिलेली आहेत. माझ्या या भाग्यवंत रूममेट्सना आपण अ आणि ब म्हणू. त्यांचे उल्लेख इथे येणं अपरिहार्य आहे. म्हणून हा आगाऊ पात्र परिचय. तसाच इथला एक मित्र क्ष. माझ्या आईलाही (किंवा फॉर दॅट मॅटर आजीलाही) नसेल, इतका त्याला लोणची, फोडणीतलं मोहरीचं प्रमाण, गवारीच्या शेंगांचा कोवळेपणा.. या सगळ्या प्रकरणात इंट्रेष्ट आणि गतीही आहे. (शिवाय त्याच्याकडे मिक्सरही आहे! : D) त्याच्या फर्माइशी, त्याचे सल्ले आणि त्याची मुक्ताफळंही इथे नोंदवली जाणार. बी रेडी! :)

शेगडी-सिलिंडरापासून पोळपाटापर्यंत आणि फ्रीजपासून सोलाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची जमवाजमव आम्ही इथे येऊन केली. त्याचे तपशील परत कधीतरी.

हे गेल्या काही महिन्यांत मला उमगलेलं एक सत्य ऊर्फ सुगरणीचा सल्ला:-

स्वैपाघरात खालील गोष्टी कायम बाळगाव्यातः:

मॅगी नूडल्स.
एक मोठा सँडविच ब्रेड (फॉर गॉड्स सेक - गोड नसलेला).
उकडलेले बटाटे.
दही आणि दूध.
लोणी आणि चीज.
टोमॅटो सॉस.
फ्री होम डिलिव्हरी देणार्‍या एक-दोन हॉटेलांचे फोन नंबर आणि मेन्यूकार्डस्.

खरं तर याहून वेगळ्या आणि अधिक बर्‍याच गोष्टी लागतात, असं माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं आहे. पण तरीही - यांचं महत्त्व काही कमी होत नाही. एखादी न फसलेली पाककृती पुढच्या वेळी.

तूर्तास अच्छा!

Comments

Snehal Nagori said…
Oho!!!
so unlike of u... and at a same time so like U....
he he its nice!!!
madhura said…
Va!Farch Chan, Sadhya tu ya blog varch concentrate kar.
Keep it up.
Snehal Nagori said…
Madhura taincha salla solide!!!
a Sane man said…
"उकडलेले बटाटे."...

he "nehami" kase bua baLagayche swayampakgharat!!!..

sahiye...yeu det ajun post...ithe try karata yetil mala mhanje!! :)
स्नेहल, मधुरा:
थ्यांकू. नियमितपणा कितपत जमतो पाहायचं. :)
ए सेन मॅनः
सोप्पंय. फ्रीजमधे. :) माझ्याकडे फ्रीज आहे म्हटलं!
a Sane man said…
assa hoy...mala vaTla tuza paN tuzya maitriNeesarkha aahe ki kay...kadhihi swayampakgharat madat mhanje baTaTe ukaDayache...tyacha kay karaycha ha aaicha prashna!... :P

kasla sahiye na Snehal-la ithe mala marta paN yeNar nahi :D
Anamika Joshi said…
ही ही ही !!! माधुरीचा सल्ला खरच सोलिड. मेघना तू त्या ब्लोग पेक्शा इकडेच जास्त लक्ष दे. हे जरा तरी बर लिहीतेस तू. म्हणजे खरच.
Snehal Nagori said…
meghana sorry, hi comment tula nahiye...
@Sane Man,
tu ye parat mag baghte tula...
ata mala barech padartha karta yetat... shati sanmashi ka hoina swayampak gharat shirte mi halli :)

tu alas ki karunch ghalte thamb khayla :D
रोहन... said…
अरे वा.. अजून एक खाद्ययात्रा सापडली.. :D

रोज काहीतरी नवीन वाचावे आणि खावे या हेतूने नवीन-नवीन ब्लोग्स शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D तेंव्हा अगदी पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग.

माझा ही एक फ़ूड ब्लॉग आहे. http://foodateachglance.blogspot.com/ त्यावर तुमचा 'खाईन तर तुपाशी ...' add केला आहे...

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

श्रीखंड यहीं बनाएँगे

कुळथाचंं पिठलं