पोळ्या - एक अर्वाचीन छळ

माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी.
आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच.
पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे. पण नाही आवडत मला पोळीची चव. फाशी देणार आहात? द्या. तरीही बाणेदारपणे हेच्च सांगीन. मला पोळी आवडत नाही. हरितक्रांतीनंतर शिरजोर होऊन बसलेल्या कणीक या फ्याशनेबल अर्वाचीन पदार्थाचा वास, पोत, चव, रंग यांतलं काहीच मला प्रिय नाही. कणीक भिजवायला घेतल्या-घेतल्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर त्या पिठाला एक प्रकारचा उबदारपणा आणि मग सूक्ष्म बुळबुळीतपणा येतो, तिथपासून ते तव्यावरची पोळी उलटताना पोळीतून कणकेच्या वाफेचा एक भपकारा येतो, तिथपर्यंत. कोण ते, ग्लूटेन ग्लूटेन म्हणून ओरडतंय? वैज्ञानिक स्पष्टीकरण गेलं गाढवाच्या गावात. आत्ता-आत्ता साठच्या दशकापर्यंत ज्वारी-बाजरी-तांदुळाचा भाकरतुकडा खाऊन आपण ढेकर देत असू आणि अगदी आजही आपल्या पितरांना घालायला कणकेच्या बाट्या न भाजता भाताचे पिंडच शिजवतो हे पोळीमाहात्म्य गाणारे लोक विसरले असतील. मी नाही विसरलेय.
आप्ल्याला-आव्डत-नाई.
कबूल आहे. हा व्यक्तिगत चवीढवीचा-आवडीनिवडीचा मामला आहे. वास्तविक इतक्या क्षुल्लक नावडीमुळे मी पोळीला इतकं खलनायकी फूटेज दिलंही नसतं. पण ‘पोळी आवडते-केली-खाल्ली-ढेकर दिली-गपगुमान झोपलं’असं करून लोक थांबत नाहीत. ते पोळीचे देव्हारे माजवतात.
तुम्ही स्वतः कधी पोळी करून पाहिली आहे का? ‘आज जेवायला काय ऑस्ट्रेलिया आहे की इंडोनेशिया?’छाप थुतरक निष्क्रिय वरवंटा विनोदांचा वीट येऊन मी पौगंडावस्थेतच माझं बंडनिशाण फडकवलं होतं, ‘मला पोळी आव्डत नाही. मी कर्णार नाही.’ मला कुणी तसा पर्याय दिला, तर मी जन्मभर भात बोकाणून माझ्या कोस्टल एलिमेंटीय पूर्वजांना मोक्ष मिळवून देईन याची जाणीव 'आकाशवाणी'ला असल्यामुळे तिकडून कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम आला नाही. एवढ्यावरच माझे आणि पोळीचे संबंध थांबू शकले असते. पण एका मैत्रिणीच्या आईचं एक चतुर मत ऐकलं आणि मी थोडा पुनर्विचार करायला सुरुवात केली. तिचं म्हणणं होतं, "कुठे कुणाच्या स्वैपाकघरात मदतीला उभं राहायची वेळ आलीच, तर मी दणादण पोळ्या करून टाकते. मीठ कुठे गं, तिखट कुठे गं, तेल कुठे गं नि साखर कुठे गं, असल्या ताशी छप्पन्न विचारणा करायला अडून न बसता एकठोकी काम होतं आणि शिवाय 'केवढ्या पोळ्या लाटल्यात बाई!' असं एक हातासरशी गुडविल तयार होतं, जे नंतर वाढण्यासारखं भावखाऊ आणि तापदायक काम निघाल्यावर हक्कानं हॉलमध्ये पाय पसरून गप्पा ठोकायला नैतिक बळ पुरवतं." हे फारच बरोबर आणि सोयीस्कर होतं. त्यामुळे आपल्याला ही कृती शिकून टाकली पाहिजे, असं माझ्या मनानं घेतलं.
इथून पुढे रानावनांनी, काट्याकुट्यांनी, दर्‍याखोर्‍यांनी आणि श्वापदांनी भरलेला प्रदेश सुरू होतो. सावधान.
पहिला धडा: 'डिसाइड अ‍ॅज वी गो' हा पर्याय घेऊन कधीही कणीक भिजवायला घेऊ नये.
इतकी कणीक, इतकं पाणी, इतकं तेल, इतकं मीठ अशी सुनिश्चित, मोजणेबल प्रमाणं तय्यार हवीत. नपेक्षा 'मी कर्णार नाही, मला आव्डत नाही' मोडवर जाणं श्रेयस्कर. प्रमाणं नसली तर अनेक अभिजात आणि कंटाळवाणे गोंधळ होऊ शकतात. पीठ-पाणी-पीठ चिकट-पुन्हा पीठ-पीठ कोरडं-पुन्हा पाणी.... ही साखळी कितीही काळ चालू राहू शकते. कोणत्याही प्रकारचं पीठ भिजवणं या कृतीबद्दल क्रॉनिक नफरत पैदा होऊ शकते. तुम्ही पुरेसे निर्ढावलेले नसाल, तर घरी येणार्‍या भोचक मोलकरणीपासून आकाशवाणीपर्यंत अनेक जण तुमचं मनोधैर्य आणि ज्ञानपिपासा नेस्तनाबूत करू शकतात. हे टाळायचं असेल, तर प्रमाण वाजवून घ्यावं. मी हे शिकण्यासाठी माझ्या गिनिपिगांना मात्र प्लाष्टिकी ते इलाष्टिकी अशा सग्ग्ळ्या पोळ्यांतून जावं लागलं. असो. बाकी नुसतं प्रमाण कळून उपयोग नसतो. नक्की काय नि कसं केलं की पोळ्या 'मऊसूत, रेशमी, तलम' होतात त्याबद्दल बाजारात जे सल्ले मिळतात, ते सगळे ऐकायचे म्हटले तर आपण पोळ्या करणार आहोत, की काडेपेटीत राहू शकणारी नि अंगठीतून बाहेर निघू शकणारी ढाक्क्याच्या मलमलीची साडी विणणार आहोत अशा गोंधळात पडण्याचा धोका असतो. कुणी म्हणतं, आधी पाणी घालावं. कुणी म्हणतं, आधी तेल घालावं. कुणी साजूक तुपावर अडून असतं. एका बाईंनी सांगितलं होतं, की आधी पीठ चाळून घ्यावं. मग त्यावर चमच्या-चमच्यानं तेल सोडावं, थोडं मीठ भुरभुरवावं आणि मग सगळ्या पिठाच्या कणांना ते तेलमीठ लागेल अशा प्रकारे पीठ दोन्ही हातांनी नीट चोळून घ्यावं. मग लागेल तसतसं किंचित कोमट पाणी घालत.... होय. संताप होऊ शकतो. बरोबर आहे. तर - ते सल्ले फाट्यावर मारून आपली स्वतःची अशी एक क्रमवार कृती निश्चित करून घ्यावी आणि कणीक भिजवावी. गोळा म्हणता येईल, अशा प्रकारचं काहीही जमलं म्हणून खूश होऊन हात धुण्यातही अर्थ नसतो. तो गोळा भिजवून, दहा मिनिटं झाकून ठेवून, मग स्वच्छ धुऊन कोरडं केलेलं बोट त्या गोळ्याच्या पोटात खुपसलं असता - अ) जोर न लावता बोट सहज आत गेलं पाहिजे आ) बोटाला कणीक न चिकटता तेलाचा अंश आला पाहिजे. हे जमणं अत्यंत क्रिटिकल आहे, कारण त्यातल्या अपयशाचे परिणाम पोळी मरेस्तोवर मिरवणार असते. ते जमल्यावर पुढची पायरी. पोळ्या लाटणे.
दुसरा धडा: विनोद डोक्यात जाण्याच्याच लायकीचे असले, तरीही पोळी गोल होणंच मानसिक-शारीरिक-भौतिक-आर्थिक-सामाजिक अशा सर्व बाजूंनी सोयीस्कर असतं.
या पायरीवरही बाजारात अनेक सल्ले मिळतात. कणकेच्या गोळ्याची गोल लाटी करून ती थेट लाटावी; तिचा लंबगोल लाटून मग तिला चिमटा काढावा आणि दोन्ही अर्धुकांत तेलाचा ठिपका टेकवून ती अर्धुकं मिटवावीत व मग त्याची पोळी लाटावी; तिचा लहान गोल लाटून मग त्यावर तेल लावावं, अर्धी घडी करावी, पुन्हा तेल लावावं आणि चतकोर घडी करावी नि ही नानसदृश घडी लाटून गोल करावी (अगदीच वेळ जात नसेल, तेव्हा ही कृती करण्यासारखी आहे. टोकं वाढत वाढत समभुज-समद्विभुज-विषमभुज असे नाना प्रकारचे त्रिकोण मिळणं, भलत्या ठिकाणी पोळी जाड होऊन बसणं, भलत्या ठिकाणी ती अर्धपारदर्शक होऊन पोळपाट दिसू लागणं या सामान्य लिळा तर साधतातच. पण विशेष एकाग्रता साधलीत, तर आपल्या दिशेच्या पोळपाटाच्या अर्धवर्तुळाभोवती कबड्डीपटू फिरतात तसं गोलगोल फिरत पोळीला चुचकारण्यासारखा नाच-ग-घुमा खेळप्रकारही अनुभवायला मिळू शकतो. असो.); मधे तुपाचं बोट फिरवावं; तेल आणि पीठ यांची पेस्ट लावावी... होय, इथवर आल्यावर मला क्षणभर भीती चाटून गेली, की 'पटकन पंचामृताचं मिश्रण करून ते चटकन ब्रशनं हलक्या हातानं लावून घ्यावं' असंही कुणीतरी सांगायचं. पण मग मी सावरले आणि फाटा जवळ केला. लोकांना चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ट... अशा कितीही घड्या घालून, त्यात तेल-तूप-मध-लोणी-मस्का-मेयॉनीज काय वाट्टेल ते घालून, त्याच्या पोळ्या लाटून, मग त्यांचे पदर सोडवण्याचे अश्लील चाळे करण्यासाठी वेळ असतो. आपण असल्या वायझेड उद्योगात पडायलाच हवं असं नाही. त्यामुळे मी गपचूप एक लाटी घेतली, भरपूर पीठ घेतलं आणि लाटणं फिरवलं. पोळी गोल झाली. इथे मी पहिला विजय मानला. सी, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट?! पण यानं होतं काय, की तुम्ही गाफील राहू शकता. तसं न होऊ देता लक्ष्यात ठेवायचं असतं, की एकच पोळी गोल होता उपयोगी नाहीय. शिवाय ती सगळीकडे एकसारख्या जाडीची असली पाहिजे. तिच्यावर इतकंही पीठ नको, की ती तव्यावर टाकताना आजूबाजूला खकाणा उडेल. पुढेही उरलेल्या पोळ्या याच दर्जाच्या नि आजच व्हाव्यात इतकाच वेळ आणि धीर आपल्याला या पोळीसाठी उपलब्ध आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या पोळीपर्यंत 'पोळी नीट लाटणे' या एकाच कृत्याचे पालक असलेल्या आपल्याला आता 'पोळी लाटणे' आणि 'पोळी भाजणे' ही जुळी कार्टी जोपासायची गोड कामगिरी करायची आहे. हे सगळं नीट करायचं असेल, तर पोळी गोल असणं सर्वाधिक रास्त आणि कमी कष्टाचं ठरतं.
तिसरा धडा: जगाची इंधनबचन गेली खड्ड्यात, तव्याखालची आच काही-केल्या कमी करायची नाही.
पोळी पापडासारखी कडक किंवा मैद्याच्या थंडगार रोटीसारखी चामट व्हायला नको असेल, तर व्यवस्थित तापलेल्या तव्यावर कमीत कमी वेळात पोळी भाजून होणं अत्यावश्यक असतं. उमेदवारीच्या काळात पोळपाटावरची पोळी गोल, आवश्यक तेवढी पातळ, एकसारख्या जाडीची, अगदीच लाज वाटणार नाही इतपत मोठ्या आकाराची आ.....णि पोळपाटाला वा लाटण्याला न चिकटणारी करण्यालाच मी पोपटाचा डोळा मानला होता. त्यामुळे झाली काय गंमत, की तव्यावर टाकलेल्या पोळीनं थेट तव्याशी काटा भिडवला. त्यांचं लफडं चांगलंच गरम होऊन धूर यायला लागल्यावर मला परिस्थितीचं भान आलं. पण तोवर पोळी मरून पडली होती. पुढच्या पोळीला हे टाळायचं म्हणून तव्यावर डोळा ठेवून बसले. परिणामी ती पोळी भाजून झाल्यावर तव्यावर वेकन्सी निर्माण झाली ती झालीच. तिकडे पुढची कच्ची पोळी पडेस्तोवर तवा इतका गरम झाला होता, की.... असो. तर टायमिंग इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स हिअर. गरम तव्यावरच पोळी भाजायची, चटकन भाजायची आणि ती भाजून होईस्तो खाली पोळपाटावर दुसरी पोळी तयार ठेवायची.
हे सगळं नीट जमलं, तर पोळीला काही भवितव्य असू शकतं.
आता मला सांगा, हे मुदलात किती लोकांनी करून जमवलेलं असतं? अर्धी लोकसंख्या तर सरळच बाद. या बाबतीत ते अत्यंत कुचकामीच असतात. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला कदाचित स्वानुभव असू शकतो. पण तरीही पोळ्यांचं सांस्कृतिक महत्त्व हे लोक ज्या प्रमाणात वाढवून ठेवतात, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. उदाहरणार्थ -
मिथ क्रमांक एक: पोळीमुळे पोषण होतं.
हा काय फंडा आहे? पोळीमुळे होतं ते पोषण आणि इतर अन्नधान्यांमुळे काय उपोषण होतं काय? एकदा एका मित्रदाम्पत्याचा त्यांचा लेकीशी चाललेला संवाद ऐकला होता. त्या लेकराला भात जेवायचा होता. आणि दाम्पत्य पोळीवर अडून होतं. म्हणजे लक्ष्यात घ्या, भाजी विरुद्ध पिष्टमय पदार्थ, प्रथिनं विरुद्ध पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ विरुद्ध पिष्टमय पदार्थ - असं या लढ्याचं स्वरूप नव्हतं. एक पिष्टमय पदार्थ विरुद्ध दुसरा पिष्टमय पदार्थ असं ते होतं. काय लॉजिक आहे? तर पोळी खाल्ली की पाय दुखत नाहीत हे मित्राच्या सासूबाईंचं ठाम मत. आपण जगात मूल आणलं, तर आणि तेव्हा त्याला अन्नाच्या बाबतीत इतपत तरी निर्णयस्वातंत्र्य असेल अशी शपथ मी मनातल्या मनात वाहिली, ती तेव्हा. भलेही ते पोळी का खायला मागेना! मी ती देईन.
मिथ क्रमांक दोन: भातानं वजन वाढतं, पोळी खावी.
इथे मी भिवया उंचावून रोखून पाहते आहे असं कल्पावं. म्हणजे, हॅलो? सगळा दक्षिण भारत एव्हाना वजनवाढीचे रोग होऊन ठार नसता झाला अशानं? बासमती सोडून भाताच्या इतर जाती असतात, त्यात कोंडा असतो, चमक नसलेली आवृत्ती खाल्ली तर बी जीवनसत्त्व मिळतं, शिवाय आपण जे उष्मांक गिळतो ते जाळले नाहीत, तर कणकेचे गोळे गिळूनही वजन वाढतंच… वगैरे वगैरे सामान्यज्ञान वाटलं जात असतं तेव्हा हे लोक नक्की कुठल्या पिठाच्या चक्कीसमोर गव्हाचे डबे घेऊन उभे असतात?
मिथ क्रमांक तीन: पोळीभाजी हेच सर्वोत्तम अन्न आहे.
डोंबलाचं सर्वोत्तम अन्न. वैविध्य या गोष्टीची इतकी मारून ठेवणारं याच्याइतकं रटाळ, नीरस, कंटाळवाणं जेवण दुसरं कुठलं असूच शकत नाही. किंबहुना माझं तर असं मत आहे की अन्नाचा फार लळा मुदलातच लागू नये म्हणून शाळांमध्ये हेच जेवण देण्याची काळजी पहिल्यापासून घेत असावेत.
मिथ क्रमांक चार: पुरणपोळी हे मराठी अस्मितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
एकतर हे म्हणणार्‍या माणसानं ती स्वतः करावी आणि खावी. मला तितके कष्ट घेऊन चाखण्याइतकी ती आवडत नाही. ज्यांना आवडते, त्यांनी ती करावी आणि चाखावी. मेरा मूड बना, तो मैं भी चाखूंगी. पण माझ्यावर तुमच्या अस्मितेचं ओझं नको. माझं मराठीपण पुरणपोळीकडे ओलीस ठेवायला मी तयार नाही. मी मराठीच आहे. आणि मला नाहीच काही घेणंदेणं तुमच्या सांस्कृतिकदृष्ट्या बळंच उन्नत होऊन बसलेल्या पुरणपोळीशी. इट इज ओव्हररेटेड. जा, काय करायचं ते करा.
पुरणपोळीसारख्या मराठीच्या सांस्कृतिक गळवाला हा असा धसमुसळा धक्का लावल्यामुळे मला नोटीस बजावण्याची तयारी आता सुरू झाली असेलच. आन देव्. आपण काही तुमच्या पोळीला टाळी वाजवणार नाही.

(इथे पूर्वप्रकाशित.)

Comments

mrinmayee said…
तुझ्या त्या मैत्रिणीच्या आईशी सहमत. मीही कुठे गेले की पोळ्यांचं काम मागून घेते. अट एकच, कणीक भिजवून द्यावी समोरचीने. हल्ली घडीच्या पोळ्यांची सवय नाहीये फार, फुलके मस्त होतात. त्याचं गणित आता परफेक्ट जमलंय. गेल्या २४ वर्षांत पोळ्या केल्या नाहीत असे दिवस एका हातावर मोजता येतील जवळपास. पण मला पोळी आवडते. लेकीलाही पोळीच प्रिय, आमच्या डोंगरेअण्णांच्या भाषेत तुकडामोड आहे ती.
लेख उत्तम जमलाय, शेअर करतेय.
Unknown said…
Just love it

मला देखील चपाती/पोळी करायला नाही आवडत. आधी खायला पण नाही आवडायची पण मुलीला आवडते त्यामुळे लाटणे भाग आहे.
मस्तच लिहलेले आहे ,अगदी मनातले.
मी कधीही चपाती लाटण्याचे काम मागून घेत नाही , जास्त कष्ट पडले तरी चालतील.
Anand More said…
मी कुचकामी अर्ध्या लोकसंख्येतला असलो तरी लेख प्रचंड आवडला आहे.
Anonymous said…
मी पक्की पोळी खाऊ पण पोळी करू नाही, लेख खूपच आवडेश �� खूप हसले ��
Tanuja said…
फारच सुरेख, छान.. अगदी मनातलंच लिहिलं आहेस. लिहित रहा आणि शेअर कर नक्की वाचायला आवडेल.
Tanuja said…
Just loved the article n your style of writing, too. Keep it up. 😍😘
Unknown said…
पाककला हा माझा आवडता छंद, कणिक तयार करणे ते पोळ्या लाटणे हा उपक्रम मला ही रटाळ वाटतो. बाकी लेख आवडला. सुंदर आहे.
Madhukar Cube यांची एक कमेंट माझ्याकडून चुकून पुसली गेली. ती इथे देते आहे. स्वारी. -
मला पोळी आवडत नाही,असं नाही. पण शाळेसाठी आईपासुन दुर गावी रहात असताना आजुबाजुच्या घरातुन पोळ्या भाजण्याचा करपट वास आला की अस्वस्थ व्हायला व्हायचं. घरी तशा भाकरीच असायच्या, पण उदास, विषण्ण वाटायचं, हे चांगलंच आठवतंय ...कारण अजुनही लक्षात येत नाही...

Popular posts from this blog

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे