फेण्या

फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे.

'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं असतं हे आकाशवाणी जाणून असल्यामुळे ते वाक्य हवेतच विरतं. कुरकुरवाक्याला जन्म देणारी बोरही बाभळीच्याच गावची असल्यामुळे ती अजिबात खचून जात नाही. रागरंग, वातावरणातला दाब, तापमान, हवामान, वार्‍याची दिशा, मूड, वेळवखत आणि आसमंतातून मिळू शकणारा पाठिंबा पाहून पुन्हा एकदा, पण या खेपेला थोड्या ठाम आवाजात, त्याच वाक्याची डिलिवरी केली जाते. "बरेच दिवसांत फेण्या नाही झाल्या." (या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तरंगती तीन टिंबं नाहीत, प्लीज नोट.) टायमिंग जमून आलेलं असेल (घरातल्या सगळ्यांना रविवार सकाळ मोकळी असणे आणि अशी रविवार सकाळ बरोब्बर तीन-चार दिवसांच्या अंतरावर उभी असणे) तर वातावरणातून दुजोरा मिळतो आणि गाडी, 'किती तांदूळ भिजत टाकू?' या प्रश्नावर सरकते.

हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे, लक्षात घ्या. फेण्यांच्या कार्यक्रमात नक्की कोण कोण कशा प्रकारची मदत करणार आहे, गिळायला कुणाकुणाला बोलावलं जाणार आहे, कधी नव्हे ते फेण्या वाळवण्याचा आचरटपणा आकाशवाणीच्या डोक्यात आलेला नाही ना, मंडळींचे डाएट प्लॅन्स कोणत्या टप्प्यावर आहेत, अशा अनेक उपप्रश्नांची उजळणी केल्यानंतर या प्रश्नाचं अचूक आणि सोईचं उत्तर सापडतं.

फेण्या वाळवायच्या असतील, तर प्रश्नच मिटला. मग त्या उपक्रमाला आपल्या दृष्टीनं तसाही काही अर्थ नसतो. म्हणजे वर्षात कधीतरी कुठल्यातरी संध्याकाळच्या बोअर आमटीभाताला टेकू म्हणून तळणाची तरतूद व्हावी; याकरता तांदूळ भिजवणं, धुणं, आंबवणं, वाटणं, ४ तास खर्चून त्याचे पापुद्रे शिजवणं आणि मग राखण वगैरे करून ते वाळवणं? कमॉन. याहून मी मेंदी सात वेळा गाळून घेऊन त्याचे कोन करीन आणि विकीन. मलमलीच्या फडक्यातून. त्यामुळे वाळवणाचा किडा कुणाला (कुणाला म्हणजे आकाशवाणीला. बाकी कुणी तितकं विकृत नाही. बाबांच्या माहेरून आलेल्या एका आजींनी एकदा 'हे काय? फेण्या वाळवाच्च्या नैत? नुसत्याच खायच्या?' असा प्रश्न विचारून स्वतःला ब्लॅकलिस्ट करून घेतलं होतं. त्यांना अत्यंत तुच्छ लुक देण्यात बाबा आघाडीवर असल्यामुळे आम्हांला त्यांचा आत्यंतिक अभिमान वाटला होता. असो.) चावला असेलच, तर तो तिथल्या तिथे ठेचावा लागतो. मग कुटुंबबाह्य असा पाचवा (वा अधिक) कोन रविवारी सकाळी उगवणार आहे(त) काय, याची सावध चौकशी. आपल्याला ओट्यापाशी उभं राहायला (हे 'ओट्यावर बैठक मारायला' असे वाचावे.) किती वेळ आहे, त्याचाही एक अंदाज. मग "३ किलो तरी तांदूळ टाक." इथून घासाघिशीला सुरुवात होते.

पुढे हे माप एका किलोवर घसरतं की वास्तववादी अशा दीड-दोन किलोंवर स्थिरावतं, हा तुमच्या आणि आकाशवाणीच्या बार्गेनिंग स्किल्सचा भाग आहे. मग तांदूळ भिजत पडल्याची खातरजमा करून घ्यायची आणि अधून मधून परमळणारा धान्य आंबल्याचा अनवट सुगंध अनुभवत रविवार सकाळीची वाट पाहायची, हा मोहक भाग वाटेत लागतो.

तांदूळ रोज रात्री चोळून चोळून धुवायचे असतात. पाणी बदलायचं असतं. तिसर्‍या रात्री ते गंधासारखे वाटायचे असतात. हे थोडे गद्य तपशील. विशेषतः वाटणाचा भाग. ते वाटताना मिक्सरच्या भांड्यात आधीच बरंच पाणी ठेवून चालत नाही. तसं केल्यास कण्या राहतात. तांदूळ आधी बारीक वाटून घेऊन मग त्यात हळूहळू पाणी घालायचं आणि प्रकरण गंधासारखं मऊ वाटून घ्यायचं. वाटतानाच मीठ घातलेलं उत्तम. मिक्सरच्या भांड्यावर फार लोड येता कामा नये, अशा बेतानं तांदूळ घालायचे. तसंच वाटणाच्या ४ ब्याच झाल्यानंतर थोडं थांबायलाही विसरायचं नाही. मिक्सर तापून रबर वितळलं आणि फेण्या बोंबलल्या असा अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. हे सगळं करताना अ‍ॅप्रन किंवा गेला बाजार जुना पंचा चढवायला विसरायचं नाही.


वाटण झालं की त्याकडे एकदा धन्य होऊन बघायचं. किमान अर्धा लीटर तरी दुधाला - सायीसकट - विरजण लावायचं.  आणि निवांत ऑफलाईन (हे 'ऑनलाईन' असे वाचावे.) जायचं.

घरातल्या इतर सदस्यांमध्येही उत्कंठा असल्यामुळे कुणीतरी फेण्यांचा साचा आणि पत्रे हुडकून, धुऊन-पुसून समोर काढून ठेवलेले असतात.रविवारी सकाळी साताच्या आसपास उठून स्वैपाकघरात दाखल व्हायचं, बस. तुम्ही एकटे नसताच. फेण्यांमध्ये जिरं घालायचं की मिरची वाटून घालायची, पांढरे तीळ हवेत की नकोत, नुसत्या मिठाच्याच छान लागतात... असा काहीतरी खल चालू असतो. सोबतीला आयता चहा. रविवारचे पेपर. रंगोली. बहुतेकदा या वादात आपलं बहुमोल मत घेऊन उतरायची गरज नसते. तिळांची सरशी होते आणि साचे लागू लागतात.पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा एक, असे सात पातळ पत्रे एका संचात असतात. हे पत्रे एकमेकांना न चिकटता वाफवता यावेत असा साचा असतो. या पत्र्यांवर प्रत्येकी एक डावभर पातळ पीठ सोडणे आणि पत्रा हातानं गोल फिरवून ते पीठ त्या पत्र्याला साऽरखं लिंपणे हा कौशल्याचा भाग आहे.हा थर कमीजास्त जाडीचा झाला तर फेणी पत्र्यापासून सोडवताना आयमाय काढायची वेळ येते. असे दोन संच हाताशी ठेवलेले असतात. एक संच भरून विनाशिट्टीच्या कुकरात (किंवा मोदकपात्रात) वाफवायला ठेवायचा आणि दहा मिनिटं कशीतरी कळ काढायची.

त्याचं झाकण निघालं की घरदार - पाहुणे असतील तर पाहुणेही. सुरुवातीला काही मंद पाहुणे लाजतात. पण हळूहळू त्यांची भीड चेपते आणि फेण्यांचं आकर्षण जिंकतं. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. येतात मागाहून. -  ओट्याशी गोळा होतं. पत्रे वाटून घेतले जातात. नवशिक्या लोकांना पत्र्यापासून फेणी सोडवायला दुसरा पत्रा, सुरी, चमचा असलं काहीतरी आयुध लागतं. पण हे असलं काहीतरी वापरणं आमच्याकडे अपमानास्पद मानतात. शिजून चकाकी आलेली पात्तळ फेणी अशी नितळपणे सुटून येते आणि थेट तोंडात जाते! ती तशी सुटली नाही, तर 'कित्ती घाई तुम्हांला? शिजायला हव्ये!' असं करवादण्याचा पर्याय असतोच.एकापाठोपाठ एक साचे शिजत जातात. सुरुवातीची क्षुधाशांती होईपर्यंत दरेक साच्यावर झडप घालून पत्र्यांची वाटणी होते. सोबत सायीचं दही आणि मीठ. गोडेतेल आणि मीठ. किंवा काहीच नाही. कधी सुरळीच्या वडीसारखी गुंडाळून घ्यायची आणि मग ती एकेक पदर सोडवत खायची. कधी तिची नीट घडीच्या पोळीसारखी घडी करून खायची. कधी आख्खंच्या आख्खं वर्तुळ तोंडात गडप करायचं... कधी दुसर्‍याकडचा पत्रा पळवायचा. आपले पत्रे राखायचे. अधून मधून ओट्यावर स्थानापन्न होऊन आकाशवाणीला सुट्टी द्यायची. सूचना ऐकणे, स्वीकारणे, परतवणे - असा खेळ खेळायचा. पुढच्या खेपेला फेण्या खायला कुणाला बोलवायचं त्याचे बेत करायचे. पुण्यातल्या तुळशीबागवासी सुपीक डोक्याच्या लोकांनी हे साचे विकायला काढेस्तोवर हाच उपद्व्याप पळसाच्या पानांवर 'एका वेळी तीन' अशा दरानं करत असत आणि वर फेण्या वाळवतही असत, त्याबद्दल गप्पा करून तेव्हाच्या मुलांची (आणि बायकांची) कीव आणि नवल करायचं. बाबांच्या माहेरच्या त्या आजींचा एकमतानं उद्धार करायचा. ऑफिसातल्या एका कोस्टल एलिमेंटनं मारे कौतुकानं कशा डबाभर फेण्या आणल्या, आणि बाकी प्रांतातल्या मंडळींना या गुळाची चव ठाऊक नसल्यामुळे तो डबा आपल्या उदरी कसा सद्गती पावला, त्याच्या कहाण्या कौतुकानं चघळायच्या. "कुणीसं दारावर येतं विकायला. पण एकेका फेणीचे तीन-तीन रुपये घेतात!" असेही पोट-अचंबे करायचे...फेण्यांची चव, वास आणि पोत जितका महत्त्वाचा असतो, तितकीच ही कर्मकांडंही महत्त्वाची असतात.

हळूहळू आत्मे तृप्त होतात, तसतशी सोडवून घडी करून ठेवलेल्या फेण्यांची डिंगोळी साचत जाते. उशिरा उठलेले वा आलेले, आणि या प्रक्रियेतले रसगंध अनुभवण्याला मुकलेले, काही आळशी लोक नंतर या फेण्या खातात.कितीही फेण्या खाल्लेल्या असल्या, तरी "मला आमटीभाताशी थोड्या ठेव गं!" असे पुकारे होतात. "फार तहान तहान होते नाही?" "मग? आंबवलेला तांदूळ! मेल्यांनो, भाकर्‍या खाल का इतक्या? सगळं पीठ संपवलंत!" असे उद्गार निघतात. "एकदा मी वाळवणारच आहे. हावरी कार्टी मेली!" असे संकल्प सुटतात...

बाकी स्वैपाकातलं काही हातून घडो ना घडो. पक्वान्नं तर मी तशीही विकतचीच खाणार. पण फेण्या नामक उपक्रमाचा वारसा मात्र मी माझ्याही स्वैपाकघरात नक्की चालवणार आहे.

तो काय निव्वळ पदार्थ थोडाच आहे?!

***Comments

Unknown said…
mazya tondala pani sutale :)

Shilpa
I am not exaggerating when I say this is reminiscent of Durga Bhagwat...

today's feminism in India is rapidly moving away from traditional tasks performed better by women...for instance in many middle-class working-women homes, cooking something well at home does not come with pride...or cooking is something you do only out of necessity and not out of fun etc....

I have argued that many recipes will eventually vanish (become extinct) from Indian homes because of this attitude...our urban lunch-plate already looks rather shrunk compared to 19th/ early 20th century....

In all writings of Durgabai I find she was never shy of performing so-called traditional tasks of women with pride...at one point she is delighted to see how the actor Sulochana is baking bhakari in 'Prapanch'....she took pleasure and pride in cooking
बाप रे! का उगाच मोठाल्ली नावं घेऊन राहिले! आभार. बाकी सवडीने.
होय, तुमचं बरोबर आहे स्त्रीवादाबद्दल. माझ्या एका कलीगनी मला विचारलं होतं, "एरवी तर इतक्या स्रीवादाच्या गप्पा करतेस, तुला कसा आवडतो स्वैपाक?" नि मी अवाक. की 'म्हणजे? या दोन गोष्टींचा काय बुवा सम्बंध आहे?' पण असा समज असतो खरा. सुदैवानं माझ्या अनेक स्त्रीवादी मैत्रिणी अतिशय प्रेमानं स्वैपाक करतात आणि अनेक निरीश्वरवादी मित्र भल्याभल्यांच्या संस्कृत स्तोत्रांमधल्या उच्चाराच्या चुका सप्रमाण सुधारू शकतात! जग अजून मस्तपैकी चाललं आहे ते अशा लोकांमुळेच. ;-)

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

पोहे आणि मी

मिसळपाव