फराळ आणि मी


खरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे.

"आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...",
"मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...",
किंवा
"हसायलाच लागल्या नं ग चकल्या! मग सऽऽगळं बाजूला ठेवून पर्रत आधण ओतलं भाजणीवर. पहाटेचे चार वाजले चकल्या हो व्हायला. पण मी हार मानली नै..."मधली हौतात्म्याची हौस मला काही केल्या कळतच नसे. हापिसातून येऊन, स्वैपाक उरकून वर हे घाणे घालायचे. त्यात हमखास यशाची हमी क्वचित. ’चकल्या पोटात मऊ राहतायत की काय’ नि तत्सम धास्ती प्रत्येकीच्या पोटात. बरं, पदार्थ तरी एकमार्गी होण्यातले आहेत? भाजण्या भाजा (”चंगली मंद आचेवर खमंग भाज बाई!"), "कणकेवर घालू नकोस रे, चिकट होईल पीठ" असल्या बजावण्या देऊन त्या दळून आणा, पोहे भाजा किंवा तळा, बेसन भाजा, पाक करा, पिठं भिजवा, फोडण्या करा, मसाले करा, खोबरं, खसखस, डाळं, काजू, शेंगदाणे, बेदाणे... नाना तर्‍हा. इतका सगळा कुटाणा करून पदार्थ नीट होण्याची ग्यारण्टी नाही ती नाही. फेकून मारण्याजोगे लाडू, खुळखुळे झालेल्या करंज्या, हसर्‍या चकल्या... असं कुणाचंही काहीही होऊ शकतंच.

त्यामुळे स्वैपाकाची माफक हौस असूनही मी फराळावर बाहेरून प्रेम करणं पसंत केलेलं. हवेत मस्त चुरचुरीत थंडी असते. उत्साही कारट्यांच्या केपांच्या पिस्तुलांचे आवाज असतात. कुणीतरी भाजत असलेल्या बेसनाचा खमंग दरवळ असतो. आपण दिवाळी अंक वगैरे घेऊन पहुडावं (पोज: हिंदी सिनेमातल्या हिरविणी पालथ्या पडून, मागे लाडीकपणे हवेत तंगड्या उडवत लोळतात, ती. मान्य आहे, आपण तितके नाजूक दिसू शकत नाही. पण विश्वास ठेवा, कैच्याकै आरामशीर वाटतं). आतून चिवड्याच्या (किंवा जे काही चांगलं जमलं असेल / बाजारातून आणलं असेल ते) बश्या भरभरून आणाव्यात नि ’हल्ली दिवाळी अंकांना काही दर्जाच राहिला नै बॉ’ असली आनंदी कुरकुर करत फस्त कराव्यात, असलं आमचं एकतर्फी प्रेमप्रकरण.

यंदा मला काय हुक्की आली (प्लीज नोट: दुर्बुद्धी सुचली, असा शब्दप्रयोग केलेला नाहीय), आपणपण फराळ करून बघू, म्हणून मी स्वैपाकघराकडे मोर्चा वळवला. तिथल्या पदाधिकार्‍यांच्या भिवया उंचावर गेल्या. पण प्रवेश मिळाला. ’दर कृतीमागे निदान पाचेक तरी सल्ले’ सहन करायची तयारी ठेवावी लागणार होती. पण माझी इच्छा प्रामाणिक नि तीव्र असल्यानं तेही मान्य केलं. ’बिघडण्याची शक्यताच नाही’ अशी खातरी ऊर्फ ख्याती असलेल्या शेवेला हात घातला नि पहिल्याच घासाला खडा लागला.

"बेसन चाळून घे."

हे असले पालथे धंदे मला जाम बोअर होतात. थेट कशात काय ते घाला, भिजवा, तळा नि मोकळे व्हा ना. चाळा म्हणे. (मागे उत्साहानं मेंदीच्या क्लासला म्हणून एका गुजरातणीकडे गेले होते. चित्रकलेच्या कृपेनं डिझाईनचा काही वांधा नव्हता. ते नक्षीचे पॅटर्न्स शिकेपर्यंत आमचे संबंध गुण्यागोविंदाचे राहिले. पण कोन बनवायला शिकण्याशी गाडं येऊन ठेपलं नि ठेपलंच. ज्या मेंदीचा कोन बनवायचा, ती मेंदी भिजवायच्या आधी म्हणे सात वेळा मलमलीच्या फडक्यातून गाळून घ्यायची. फडक्यातून? सात वेळा? इतका रिक्काम** धंदा बघून संतापानं माझ्या तोंडाला फेस यायचा तेवढा शिल्लक होता. पुढे आमच्यात जे काही संभाषण झालं ते सांगण्यात काही अर्थ नाही. पुढे ’श्रीमती’ नामक कंपनीनं उत्तम रंगणार्‍या नि न अडकणार्‍या मेंदीचे कोन बाजारात आणून हा प्रश्न कायमचा निकालात काढला. असो.)

तर बेसन चाळलं. गुठळी होऊ न देता भिजवलं. साधारणपणे थालीपिठाच्या भाजणीहून थोऽडं सैल आणि भज्यांच्या पिठाहून बरंच घट्ट असं ते असावं. (काही जातीचीच दुष्ट, मांसाहारी फुलं असतात पहा - त्यांचे परागकण इतके चिकट असतात, की मधाच्या मोहानं तिथे गेलेला भुंगा वा फुलपाखरू त्यावर जाऊन बसलं की त्या परागकणांतून त्याला काही केल्या बाहेर येता येत नाही. जितके हातपाय हलवेल, तितकं ते अजूनच फसत जातं नि अखेर फुलाच्या भक्ष्यस्थानी पडतं. त्या फुलपाखराला तेव्हा नेमकं कसं वाटतं ते जाणून घ्यायचं असेल, तर शेवेचं पीठ भिजवण्याचा एक्सरसाईज करून पाहण्यासारखा आहे. तर पुन्हा, असो.)

मग सोबत एक कुंड्या पाण्यानं भरून घेतला. (शेव करताना किमान तेरा हजार वेळा तरी पिठानं बरबटलेले हात धुऊन घ्यावे लागतात. आपण स्वतःलाच लेडी मॅकबेथ वाटायला लागतो. शिवाय हात पुसायला घेतलेला नॅपकीन हरवतो नि गाऊन दोन्ही बाजूंनी ओलाचिंब + बेसनचिंब होतो.) एक छानसा चमचा घेतला. चमचा पाण्यात बुडवून मग त्या चमच्यानं भिजवलेलं बेसन घेतलं नि सोर्‍यात भरलं. (चमचा पाण्यात बुडवून घेतल्यामुळे चमच्याला बेसन चिकटत नाही, अशी आकाशवाणी होती. पण तसं काहीही होत नाही. शेवेकरता भिजवलेलं बेसन गोंद म्हणून वापरायला हरकत नाही इतकं चिकट असतं नि ते जगात शक्य त्या सगळ्या ठिकाणी चिकटतं.) तापत टाकलेल्या तेलाच्या तापमानाचा अंदाज घेऊन (बेसनाचा थेंब तेलात टाकल्या टाकल्या उत्साहानं फसफसत वर आला की, तेल तापलं म्हणावं.), भरला सोर्‍या हाती घेऊन मी तेलात शेव पाडायला सज्ज झाले. तेव्हा पहिला साक्षात्कार झाला की, तळणाचे पदार्थ करायला माझी उंची कमी पडतेय. मग सोर्‍या बाजूला ठेवून आधी पायाखाली पाटाची प्रतिष्ठापना केली. तोवर तेलातून वाफ यायला लागली होती. म्हणून ग्यास बारीक करून तेल पुनश्च पूर्वीच्या तापमानाला आल्यावर मी सोर्‍या दाबला. काहीच होईना. दातओठ खाऊन दाबला. जिवाच्या आकांतानं दाबला. तेव्हा कुठे शेवेचं डोकं बाहेर येताना दिसायला लागलं. (शटप! आय नो.)

"पीठ सैल करायला हवंय." आकाशवाणी. माझा तिळपापड. पुनश्च पीठ-फुलपाखरू-पीठ-हात धुणे सव्यापसव्य. बॅक टू ’सोर्‍या भरून सज्ज’ स्टेप.

एकाच वेळी सोर्‍या योग्य त्या प्रमाणात दाबणे, तापल्या तेलात शेव पाडवताना एकाच ठिकाणी पिठाचे गोळे होऊ न देता - हात गोल गोल फिरवत कढईभर शेवेचं चाक तयार करणे आणि उडू शकणार्‍या तेलापासून + वाफेपासून स्वतःचा हात वाचवणे - ये अपने आप में एक साधना का विषय है.

काहीही आक्षिडण घडू न देता मी हे जमवलं नि धन्य होऊन स्वतःवर खूश होत उभी राहिले, तोच आकाशवाणी, "अग, अग! उलट की. करपली बघ!" च्यामारी! म्हणजे श्वास टाकायचीही सोय नाही म्हणा की.

तर त्या चाकातून बुडबुडे येणं कमी झालं की ते चाक अलगद उलटायचं. ग्यास कमी करायचा. नि शेव जराही लालसर होऊ न देता एका नियत क्षणी ते चाक झार्‍यानं उचलायचं. दुसरा कालथा किंवा चिमटा दुसर्‍या हाती घ्यायचा नि ते चाक तळणीच्या वर धरून त्यातलं तेल निथळवून टाकायचं. मग शेजारी जुनं वर्तमानपत्र घालून सज्ज ठेवलेल्या परातीत ते अलगद ठेवायचं. मग सोर्‍या पुन्हा भरायचा. हात धुऊन तळणीकडे. साधारणपणे साडेचौथ्या चाकापासून शेव कढईत पाडल्यापाडल्या सोर्‍याकडे धावून त्यात बेसन भरणं नि पुन्हा शेव जळायच्या आत तळणीकडे जाणं जमू शकतं. ते जमेस्तोवर तेल अनेकवार धुरावून आपला प्राण काढतं.

हे तंत्र जमेस्तोवर माझ्या शेवेची पहिली तीन चाकं इस्टमनकलर होऊन बसली होती. पण तितकी किंमत माफक समजावी. अखेर शेव जमली, हे खरं!



मग धीर चेपून मी चकलीला हात घातला. त्या प्रांतात म्हणे नशिबाचा वाटा फारच मोठा असतो. त्यामुळे भाजणीवर आधण ओतून ती मळण्यापर्यंतच्या पायर्‍या माझ्या सहभागाविना पार पडल्या. चकली तळण्याच्या तंत्रातही मोठ्या प्रमाणावर संयमाची आवश्यकता असल्यामुळे (बरोब्बर! मंद आचेवर.) मला तिथे प्रवेश नव्हता. ("च्च्‌ च्च्‌! नको ग! तुला नाही जमणार. तुला सगळी घाई असते. पोटातून कच्च्या काढशील नि एक घाणा काढून ’हुड! फार वेळ लागतो बॉ’ म्हणून चालती होशील. मग ते कुणी निस्तरायचं? हो बाजूला.") चकल्या पाडून देण्यावर सौदा तुटला. शेवेच्या अनुभवामुळे मी आत्मविश्वासानं सोर्‍या हाती घेतला.



राईट! दाबला. नथिंग. जोर काढून दाबला. प्राणपणानं दाबला. दातओठ खाऊन दाबला. सोर्‍यावर ऑलमोस्ट उभी राहिले मी. पण चकली पडेना.

"पीठ सैल करायला हवंय," माझा माफक सूड काढण्याचा प्रयत्न + अनुभवातून आलेला आकाशवाणीला सल्ला देण्याचा आत्मविश्वास.
"अहं, घट्ट असतं पीठ चकलीचं. काढ जोर. नसलं जमत तर दे इकडे." आकाशवाणी.

स्वाभिमान दुखावला जाऊन मी तळवलकरांकडे वर्षानुवर्षं वाहिलेल्या पैशांना शपथ घातली. अखेर चकली पडायला लागली. पण सोर्‍यावर विशिष्ट दाब, खाली पडणार्‍या पिठाची गोलाकार चकली व्हावी म्हणून एका सूक्ष्म कोनात हात गोऽल फिरवणे, चकली बरोब्बर अडीच वेढ्याची करून थांबणे (बाहेर येणारं पीठ एकदा बाहेर यायला लागलं, की इतक्या उत्साहात असतं की ते अचूक क्षणी थांबवणं हा एक विजयाचा क्षण असतो) नि हे सगळं करताना मधलं भोक शक्य तेवढं छोटं ठेवण्यासाठी एका हाताचा वापर करून चकली घट्टमुट्ट बांध्याची राखणे... सोपं नाही. ब्रह्मांड आठवतं. करून पाहा हवं तर.




मग त्या हसू नयेत म्हणून प्रार्थना करणे नि पेशन्सचा डाव लावून त्या मं‌ऽऽऽऽऽद आचेवर तळणे. (हे करताना कंटाळा येऊ नये म्हणून ’काय बै लोकांकडच्या चकल्या... नुसत्या काळ्याकुट्ट / तेलकट्ट / कडक्क... खाववतं कसं कुणास ठाऊक बै!’ असा एक ढेकर देणारा, आत्मसंतुष्ट कार्यक्रम असतो. आपल्याच चकल्या बिघडल्या, तर काय करतात त्याची चुणूक मात्र सुदैवानं मिळाली नाही.) हे सगळं करून फायनली चकल्या आटोपतात तेव्हा माणूस अर्धमेला झालेला असतो.



मी मात्र मागलं आवरून, ओटा + भांडी घासून, फराळ भरून ठेवला. वरून तळणीचं तेल फुकट जाऊ नये नि पुन्हा पुन्हा तापवावंही लागू नये म्हणून त्यात हातासरशी फोडणी करून ठेवली, तेव्हा मला एकदम टीव्हीवर स्वैपाकाच्या फडतूस टिप्स द्यायला जाणार्‍या साटोपचंद्रिकांसारखं भलतंच आत्मविश्वासपूर्ण वाटायला लागलं. झाली एवढी अनुभवाची + आत्मविश्वासाची कमाई पुरे झाली अशी खूणगाठ बांधली नि मी नव्याच मायेनं दिवाळी अंकांकडे वळले (इथे ’लोळले’ असं वाचावं).

फारच स्फुरण चढलं कधी, तर लाडवाच्या पाकाला आव्हान देऊन पाहणारेय मी, नाही असं नाही. पण एरवी आपलं मत महिला गृह उद्योगाला नक्की.

Comments

हा हा मजा आली वाचताना...
तुम्ही नक्कीच चांगल्या चकल्या करत असणार त्याशिवाय इतकं डिटेलिंग जमलं नसतं...मला चकली प्रकियेतले नवे संदर्भ कळले...:)
आता लाडवांचा नंबर कधी येतोय....:)
ashish16 said…
खल्लास :) हसू आवरत नाहीये
ashish16 said…
खल्लास, हसू काही केल्या आवरत नाहीये. बेस्ट ऑफ लक :)
अपर्णा: नाही हो, मी खरंच उमेदवारीखेरीज काहीसुद्धा केलेलं नाही! लाडू ट्राय केले कधी, तर वृत्तान्त देईन नक्की. :)
आशिष: ठ्यांकू!
Snehal Bansode. said…
किती दिवसांनी पोस्ट छान वाटलं...खरंच हे सोऱ्या प्रकरण अवघडच असते...शिवाय शेव आणि भजी करताना झाऱ्याला बेसन फासून ठेवणे, यात माझा हातखंडा.. आणि बाबांचा झारा मात्र कसा काय स्वच्छच राहतो, या प्रश्नाचं उत्तर मला अजून सापडलेलं नाहीए..
Snehal Bansode. said…
किती दिवसांनी पोस्ट, छान वाटलं..खरंच हे झारा प्रकरण भयंकरच असतं...शिवाय शेव आणि भजी करताना झाऱ्याला बेसन फासून ठेवण्यात माझा हातखंडा आहे...आणि बाबांचा झारा मात्र कसा स्वच्छ राहतो हा मला अजूनही न सुटलेला प्रश्न आहे...
Unknown said…
खूप दिवसांनी दिवाळीचा अंक हातात आल्यासारखं वाटलं. लिहिण्याची ष्टाईल कळवळून हसवणारी आहे.
आणखी काय लिहिता ?
Unknown said…

खूप दिवसांनी दिवाळीचा अंक हातात आल्यासारखं वाटलं. लिहिण्याची ष्टाईल कळवळून हसवणारी आहे.
आणखी काय लिहिता ? - विद्या
Unknown said…
खूप दिवसांनी दिवाळीचा अंक हातात आल्यासारखं वाटलं. लिहिण्याची ष्टाईल कळवळून हसवणारी आहे.
आणखी काय लिहिता ?
Manasi said…
खूप छान, हसवणारा लेख! आता लाडवांवर लेख येण्याची वाट बघायला हवी :)
Manasi said…
Chaan, hasavnara lekh!
Unknown said…
Hi,
Mast zali ahe post :) agadi photot disanarya chakalyan sarakhich :)
And diwali ank vachanyachi pose tar farach mast (mazi pan agadi tashich asate)
Dk said…
paragchya blogvarun (
"ब्लॉगर्स आणि त्यांचे मला आवडलेले ब्लॉग") ith aalo an he kase kaay vachle naahi as Zaale...

diwali bahot door hai pan hya blog chi mejvaanee bhaare aahe ekdam :D
Unknown said…
वा वा मस्त,खुप मज्जा आली. किचनमध्ये असल्यासारखचं वाटलं. फारचं छान. पण सगळे पदार्थ येउ देत अजून धमाल येईल.नशिबानी माझ्या चकल्या कधी फसल्या नाहीत मात्र त्या फसु नयेत म्हणुन करावी लागणारी नशिब आणि देविची आळवणी मात्र आठवली.चकल्यांच्या सुरुवातीला "गजानना गणपतीराया चांगल्या होऊ दे रे चकल्या" हे आईचे शब्द आठवले. वा वा बहार आणली लेखाने.
Unknown said…
बायो मेघना उशिराने वाचले पण जे बात ग,स्वयंपाकाची आवड असूनही मला का कोण जाणे हा फराळ ज्याम वैताग वाटतो,चकल्या हसतात,करंज्या फुटतात,लाडू ढासळतात, चिवडा नेमस्त होतो,मजा नाय ब,आणि या फराळाच्या प्रक्रियेत जो एक सुक्ष्म आढत्याखोर सूर असतो ना तो डोक्यात जातो,म्हणजे फराळ किनई घरीच करावा,आपली संस्कृती आहे,मुलांना कसं कळणार मग,आपण परंपरा नको का जपायला ??अरे च्यामारी कोपर्यावरच्या वाण्याकडे पण भाजणी चकल्या मिळतात रे,एवढी उरसफोड न करता मस्त एंजॉय करा की दिवाळी,पण नाही,आम्ही हुतात्मा होणार,असो ,व्हा तुम्ही,मी तुझा आदर्श ठेवून लोळत वाचणार मस्त,

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे