पोहे आणि मी

रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता?
बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर भरत नाहीच. शिवाय पित्ताला आमंत्रण. आणि खरं सांगायचं तर काही खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. अशा वेळी मी हमखास पोह्यांचा आश्रय घेते.
पोहे पुरेश्या दुधात भिजवावेत. साय असल्यास उत्तम. त्यावर पोह्यांच्या साधारण एक द्वितीयांश तरी दही घालावं. चवीपुरतं मीठ आणि तवंगासकट फोडणीची मिरची / लसणीचं तिखट / तळलेली सांडगी मिरची किंवा मग चक्क लाल तिखट. चमच्यानं किंवा हातानं. आपापल्या मगदुरानुसार कालवावेत. आणि ओरपावेत. परब्रह्म.
सकाळी सिंकमधे पडलेली खरकटी वाटी / कुंड्या / पातेलं बघून आईची दणदणीत हाक आलीच पाहिजे - जागलात वाटतं काल? उठा आता महाराणी...
दहीपोहे हा निव्वळ रात्रीच्या उपाशी जागरणांशी असोसिएट केलेला पदार्थ नसून माझ्या बाबांच्या वात्सल्याशीही तो निगडीत आहे. बर्‍याचदा संध्याकाळी बाहेरून गिळून आल्यावर 'हॅ, मला नाहीये भूक. मला नकोय जेवायला' असा आत्मविश्वासपूर्ण पुकारा करून मी परत कॉम्प्युटर / सिनेमा / टीव्ही / पुस्तक / फोन यात घुसते आणि माझी आई श्यामची आई नसल्यामुळे तीही बिनदिक्कतपणे मला वगळून स्वैपाक उरकून जेवणं उरकूनही घेते. पण साधारण साडेअकरा-बाराच्या सुमारास या कुशीवरून त्या कुशीवरून करताना किंवा पुस्तकात लक्ष न लागल्यामुळे इकडेतिकडे बघताना भूक लागल्याचं माझ्या लक्षात येतं. आईला हाक मारून उपयोग नसतो. कारण ती जागी असली तरी ढीम हलणार तर नसतेच; खेरीज 'मगाशी विचारलं तेव्हा तुला भूक नव्हती, आता का? ये बाहेरून खाऊन रोज...' इत्यादी प्रेमळ वाक्योच्चाराची दाट शक्यता असते.
अशा वेळी मॅच वगैरे चालू असल्यामुळे बाबा जागे असले, तर प्रश्नच मिटला. ते मस्तपैकी दहीपोहे कालवतात. त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही. आईच्या 'अहो, हे काय हे..' वगैरेकडे सोईस्कर काणाडोळा करून आमचं जागरण एकत्र साजरं होतं. दहीपोह्यांच्या साक्षीनं.
दिवाळीच्या दिवशी सकाळी मात्र हेच दहीपोहे माझ्यासाठी लीगसी असतात. पेण किंवा रत्नागिरीहून आलेले लालसर रंगाचे पोहे. गिरणीत नव्हे, भट्टीत फुलवलेले. त्यांची चव निराळीच लागते. त्यावर सायीचं दही, फोडणीची मिरची, मीठ आणि किंचित साखरही. फराळाच्या ऐवजी मी नि आई हे पोहेच खातो. आईच्या माहेरी तिला पहिल्या आंघोळीच्या सकाळी असे दहीपोहे खायला आवडत. कदाचित आजीच्या माहेरच्या गरिबीचाही धागा त्याच्याशी जोडला गेला असेल. नाहीतर दिवाळीच्या दिवशी सोन्यासारखा फराळ सोडून दहीपोहे कोण खातो? कारणं काहीही असोत. आईनं ही आठवण कधीतरी सांगितल्यापासून मीही अगदी उद्मेखून आईच्या दहीपोह्यातच सामील असते. त्या दिवशी आमची युती!
रविवार सकाळ आणि पोहे हाही एक अविभाज्य संबंध. पुरवण्यांचा पसारा घालून, एकीकडे 'रंगोली'मधली गाणी ऐकत पोहे हाणल्याशिवाय रविवार सुरूच होत नाही.
बाकी पोहे हे कांदेपोहेच असायला हवेत असं काही नाही. बटाट्याच्या काचर्‍याही पोह्यात सुरेख लागतात. पण मग पोह्यात 'ती' गंमत येत नाही. वांगीपोहे मात्र माझ्या आवडीचे. तेलात नीट खरपूस तळलं गेलेलं वांगं पोह्यासोबत असं काही जमून येतं की ज्याचं नाव ते. मटारच्या मौसमात मटार घातलेले पोहे त्याच्या रंगामुळे साजरे दिसतात. पण दाणे मधेमधेच येतात... ('गाढवाला गुळाची चव काय? मटार मधेमधे येतो म्हणे. सोलताना खातेस तेव्हा नाही का मधे येत?' इति आईसाहेब!) देशावर तर पोह्यात शेंगदाणे घालतात. पण कित्ती खरपूस तळले तरी पोह्यात शेंगदाणे? छ्या:! एक वेळ कांदा नसेल, तर कोबी घालून पोहे करीन मी - छान लागतात - पण पोह्यात शेंगदाणे? आपल्याला नाई बा पटत.
दडपे पोहे हाही माझ्या प्रेमाचा पदार्थ. स्वैपाघरातून पाटा लुप्त झाल्यामुळे ते दडपून वगैरे ठेवले जात नाहीतच. पण तरी नाव मात्र दडपे पोहेच. पोह्यावर साधी हिंग-जिरं-मोहरीची फोडणी ओतून ते कालवून घ्यायचे आणि मग त्यात पात्तळ चिरलेला कच्चा कांदा, भरपूर कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, साखर, लिंबू (कुणी कुणी टोमॅटोपण घालतात म्हणे. पण ही नक्कीच अर्वाचीन ऍडिशन असणार. आपण परंपराप्रिय!) मिसळायचं. हातानं. हे महत्त्वाचं. आणि मग दातांना व्यायाम देत देत ते खायचे. काहीसे चामट असले तरी बेफाम स्वादिष्ट. चावून चावून दात दुखायला लागतात, हिरड्या सोलवटतात - असले नाजूक नखरे अंगात असतील, तर मात्र पोह्यांना मुकलात. याच पोह्यांच्या आणि एका व्हर्जनमधे ओल्या खोबर्‍याच्या ऐवजी ताक शिंपडतात. माझ्या डाएट-दिवसांमधे मी बर्‍याचदा हीच वापरत असे. पण खरं सांगू का, कुठल्याही लो-कॅलरी पदार्थासारखाच तिच्यातही राम नाही. आणि एका आवृत्तीत पोह्यांना फोडणी देतच नाहीत. आपला काळा (किंवा गोडा) मसाला, कच्चं तेल आणि किसलेलं सुकं खोबरं. बाकी कांदा, मिरची, मीठ, साखर, लिंबू. कालवा आणि खावा. मात्र यात भाजून चुरून टाकलेला पोह्याचाच पापड 'मस्ट'.
पोह्यांच्या याच प्रेमापायी मला कोळाचे पोहे नामक फक्त वाचनातूनच भेटलेला पदार्थ खाण्याची नुसती असोशी लागून राहिलेली होती. 'इतकं नारळाचं दूध कोण काढत बसेल? आणि मग डाएटचं काय? इतके काही छान नाही लागत गं ते पोहे..' यावर आईनं माझी बोळवण केलेली. शेवटी मी 'रुचिरा' की कुठल्याश्या पुस्तकातून हुडकून एकदाचे ते पोहे केले. कच्चे पोहे, त्यावर तितकंच नारळाचं दूध. साधारण एक चतुर्थांश वगैरे चिंचेचा कोळ. मीठ. गूळ. हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आयत्या वेळी मिक्स करून खायचे. पण स्वतः नारळाचं दूध काढण्याचा खटाटोप केल्यामुळे की काय कुणास ठाऊक, खरंच तितकेसे चांगले नाही लागले.
पोह्याचं डांगर हा तर सर्वज्ञात आणि लोकप्रिय प्रकार. मला मात्र तो तितकासा आवडत नाही. त्यातली पापडखाराची चव पुढे आली - आणि ती बर्‍याचदा येतेच - की सगळा रसभंग होतो. त्यापेक्षा पोह्याच्या पिठाची एक सात्विक चवीची आवृती मला प्यारी. साधारण चमचाभर पीठ आणि कपभर दूध असं एकत्र कालवावं. थोडा गूळ घालावा. कालवताना जपून कालवावं लागतं मात्र. गुठळ्या राहून चालत नाही. तसंच हावरटासारखं चमच्याभरापेक्षा जास्त पीठ घालूनही चालत नाही. ते हा हा म्हणताना फुगून बसतं. आणि पंचाईत होते. रसायन नेमक्या पोताचं आणि चवीचं जमलं, तर मात्र जे काही समाधान होतं, की बस. कम्फर्ट फूड का काय म्हणतात ते हेच, अशी खात्री पटते.
दळवी कुठेसे म्हणून गेलेत - मला मेल्यावर समुद्रात टाका. मी जन्मभर माशांवर जगलो. त्यांना एक दिवस तरी माझ्यावर जगू द्या...
त्यांचं ठीक आहे. काहीतरी मार्ग तरी होता. मी पोह्यांचं हे ऋण कसं फेडणार?

Comments

Tulip said…
झकास पोस्ट! कांदेपोहे (बटाटे घालूनच अर्थात) आणि रविवार यांच अतूट नातं आहे. मात्र ते छान मऊ मोकळे शिजलेले हवेत बुवा. आणि त्यावर काहीजण बारीक शेव वगैरे घालून खातात ते पण नको. काहीजणांकडे (जोशांकडे :P) जाड्या पोह्यांऐवजी पातळ पोहे भिजवून फोडणीला टाकलेले पाहिलेत आणि मग त्या मधे मधे पोह्यांच्या गुठळ्या आणि इन्जनरल गोळाच होतो तो. श्या.. असल्या पोह्यांपेक्षा चिवडा खावा (नाहीतर फ़ोडणिचा भात:D). खरंतर पोहे हा प्रकार घरगुतीच करावा आणि खावा. पाहुणे आल्यावर करायला उपमा वगैरे असतो की. तुझे दहीपोहे मात्र खाल्लेले नाहीयेत कधी. केलेच पाहीजेत.
a Sane man said…
"मटारच्या मौसमात मटार घातलेले पोहे त्याच्या रंगामुळे साजरे दिसतात. पण दाणे मधेमधेच येतात...
पण पोह्यात शेंगदाणे? आपल्याला नाई बा पटत."

हिहिहि! दे टाळी!

"...(कुणी कुणी टोमॅटोपण घालतात म्हणे. पण ही नक्कीच अर्वाचीन ऍडिशन असणार. आपण परंपराप्रिय!)"

त्या साहित्यात मी टॉमेटो शोधत होतो, हा कंस येईस्तोवर...मला टॉमेटोचीच सवय आहे. छान लागतात अगं...त्या दडदडीत प्रकारात मध्येच असा मऊसर टॉमेटो आला की बेस्ट...कॉंट्रास्ट म॓चिंग!

मी म्हटलं कोळाचे पोहे का येत नाहीयेत. ते का एवढे शेवटी? नि ते सगळं आयत्या वेळेस नाही काही एकत्र करायचं. कोळाचे पाणी आधीच करून ठेवायचं. कोळलेली चिंच, नारळाचं दूध नि त्याला जिर्‍याची फोडणी, हिरव्या मिरचीसह, नि गूळ. असं आंबट, गोड, तिखट. नि पोहे भिजवून ठेवायचे. नि आयत्या वेळी हे पोह्यावर सढळ हस्ते ओतून खायचं. बरोबर अर्थातच मिरगुंड हवीतच! पोह्यांचा मला सर्वाधिक आवडणारा प्रकार आहे हा...तू म्हणतेस तसं काही लोक पातळ पोह्यांवर पण ते कोळाचं पाणी ओतून खातात...ते अगदीच दडप्या पोह्यासारखं लागतं....मला व्यवस्थित भिजलेले जाडे पोहेच प्रिय!!! मी इथे रेडिमेड नारळाच्या दूधाचे केले...ते जरा ठीकठाकच झाले, ताज्या नारळाच्या दूधाची चव त्याला कुठली यायला!

दळवींचं वाक्य भारी आहे!

झकास!
saanasi said…
पोह्यांनी मला पण खूप हात दिला आहे.
पोह्यात शेंगदाणे,मटार,टोमॅट हे सगळं आवडतं मला.

माझे आवडते 'गूळ पोहे' मात्र दिसले नाहीत,त्यामुळे चुटपुट लागली.
Kiran said…
सहीच लिहल आहेस
माझे अजोल कोल्हापुरचे आहे आणि म्हणून आम्ही पोह्यावर तव मारतो अस समस्त नातलग टोमणे मारतात
who cares .
पण दडपे पोह्या बद्दल लिहालेल अगदी खर आहे .
Snehal Nagori said…
pohe bestch astat!!!

jad pohyawar panyat kalwun tyat mith ghalun pan khate mi...
ani patal pohyancha bakana tondat bahrun gayisarkha rawanth karayla pan dhammal yete!!!

asa aaji / aai ashya lokansamor khau naye...

nahitar dalbhadripaneche dohale ashya kahi achat sankalpnanna samora jawa lagta!!

@sane man,
i agree,
kolache phe altimatech lagtat!!
yuga lotali te khaun :(
खरं आहे. रात्रीच्यावेळी पोहे माझ्यासाठीसुद्धा एकमेव hope असतात. पोह्यात सांडग्याची मिरची, एक पापड आणि वरून लिंबू...
हातातल्या पुस्ताकालापण चव येते...
Mints! said…
ajun ek prakaar rahila tup/tel, metkooT, paataL pohe. he sagaLe ekatra karun daLaN daLat pustak vachayache. kharokhar sahi lagato to ek prakaar.
मस्तच एकदम...वाचून उगीच भूक चाळवली....पण मिळनार पण नाही आहे?
Sahaj kadhi said…
nice post. .

bhuk lagaleli astana ha blog wachu naye asa disclaimerach takayla hawa :)
Snehal Nagori said…
hey ha photo solide!!!
a Sane man said…
oh...hyacha pan dress badlala...to foto jara lahan nahi ka karta yenar...angapeksha bonga motha zalay nahi??
Mugdha said…
:) pohe...!!!

bass naam hi kaafi hai..

post chhan aahe..mala khup aavaDala..

-mugdha..
mugdhajoshi.wordpress.com
GaneshG said…
hyasarkhech gul ani pohe dekhil changlech
Veerendra said…
बास ,, उगाच मन चाळवले .. अतिशय वीक पोईंट आहे .. पोह्यांबरोबर मस्त पापड आणि शेंगदाणे असतील तर मजा काही औरच ..
कोकणांत नरक चतुर्दशीला कारंदे उंबर्‍यावर फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वध होतो. मग पोह्यांची मेजवानी सुरू होते. वांगीपोहे, बटाटपोहे, ताकातले पोहे, दडपे ...आणि मुख्य म्हणजे नुकतेच कांडलेले पोहे दरवळ सोडतात. शहरी फराळाचे पदार्थ दुय्यम... धुळ्याकडे पातळ पोह्यांना तिखटमिठ लावून खातात, त्याला काहितरी नांव आहे . आता आठवत नाही. पण दडप्या पोह्यांची चव त्याला नाही
कोकणांत नरक चतुर्दशीला कारंदे उंबर्‍यावर फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वध होतो. मग पोह्यांची मेजवानी सुरू होते. वांगीपोहे, बटाटपोहे, ताकातले पोहे, दडपे ...आणि मुख्य म्हणजे नुकतेच कांडलेले पोहे दरवळ सोडतात. शहरी फराळाचे पदार्थ दुय्यम... धुळ्याकडे पातळ पोह्यांना तिखटमिठ लावून खातात, त्याला काहितरी नांव आहे . आता आठवत नाही. पण दडप्या पोह्यांची चव त्याला नाही
Shubhangee said…
आमच्या गावाकडे(दक्षिण कर्नाटक) दडप्या पोह्यांसारखे पोहे करतात, त्यात फोडणी घालत नाहीत पण नारळ भरपूर.कोथींबिर तिकडे सहसा मिळत नसल्याने धने-जिरे पावडर घालतात,(बाकी हिरवी मिरची , कांदा असतोच) बरोबर तळलेला फणसाचा पापड
आणखी एक भरपूर नारळ आणि गुळ घालून बनवलेले गोड पोहेदेखील फार छान लागतात. तुमचे पोहे पुराण वाचून या दोन पाकक्रिया सांगाव्याशा वाटल्या जमल्या तर करुन बघा.
Sharayu... said…
Dalvi naahi Pu.La asa lihun gelet tyanchya 'Hasavnuk Phasavnuk' hya pustakat. Baaki lekh chaanach hota. Pohe are my all-time favourite too. (vaange ghaalun nakki pohe karin hya sundayla.) Keep Writing. :)
do said…
hudukun kaadhle hi post aataa pohe khaatoy :D
Anonymous said…
दळवी म्हणजे ग्रेटच. मला अशाने अर्ध्याहून जास्त पोल्ट्री फार्ममधे जावं लागेल पण असो. पोहे फ्यावरीटच माझेपण.
कच्चं तेल, तिखट, मीठ, काळा/गोडा मसाला आणि शेंगदाणे मस्टच! सगळं मिक्स करून हादडो... :D
Anonymous said…
मस्त लिहिलंयस, मेघना! :-)

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

मिसळपाव