डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक. मशीनमधली कितवीतरी कॉफी घेतानाही 'साखरेचा क्यूब टाकू की नको' असा धाक आणि मोहाच्या सीमारेषेवरचा प्रश्न दर वेळी. सामोशाच्या काउंटरवरून अंमळ चिडचिड करतच स्वतःला फ्रुट बोलच्या नीरस-नॉन ग्लॅमरस पर्यायाकडे वळवणं. काळोख पसरायला लागायच्या वेळी ऐन रहदारीच्या रस्त्यावरून परतताना घराचं कुलूप काढण्यासाठी स्वतःला एनकरेज करत, वाटेवरच्या लायब्ररीचं लॉलिपॉप दाखवत दाखवत जाणं.

'अमेरिकन लेज्' आणि तत्सम इझी कम्फर्ट एस्केप्सच्या जाळ्यात सापडण्याची हीच नेमकी वेळ.

त्या दिवशी मात्र चाळा म्हणून रस्ता थोडा बदलला तर भाजीवाल्यांची एक अलीबाबा-गुहाच समोर आल्यासारखी झाली.

उच्चमध्यमवर्गीयांच्या वस्तीत असतात तसली मोनोपॉलीनं माजलेली, महागडी, ब्रोकोली + पालक + टोमॅटो + कोबी + फरसबी इतपतच माना टाकलेले पर्याय असलेली दुकानं नव्हती ती. दुकानं नव्हेतच. गाळे. भाजीवाल्यांचे गाळे.

मोडाची कडधान्यं टोपल्यांत घेऊन बसलेल्या माम्या. हिरवीगार चवळई-माठ-अंबाडी-चाकवत-मेथी-पालक, शेपू-कोथिंबीर-पुदिना. बामणी पोपटी मिरच्या नि फटाकड्या हिरव्यागार मिरच्या. त्यांच्या मधोमध आले-लिंबाचा ढीग. ताजा फडफडीत कढीपत्ता. भलेथोरले भोपळ्याचे नि कोहळ्याचे तुकडे, काळीभोर वांगी, ताजी लसलसती गवार नि घेवडी. झालंच तर कांद्याची नि लसणीचीही पात. शेवग्याच्या शेंगा. लालसर रताळी. इवले इवले कांदे. काय न् काय. भरपूर आरडाओरडा. ओयस्तो पिशव्या भरभरूनही इथे-तिथे रेंगाळणारी गिर्हाइकं. रस्त्यात मधेच टाकलेले सडक्या पाल्याचे ढीग नि त्यातून वाट काढत हिंडणारं एक चुकार ढोर.

सगळं यथासांग. परिपूर्ण. लंपनच्या भाषेत सर्वांगसुंदर.

हरखलेच मी. एकदम मूड बदलून गेला. काय घेऊ न् काय नकोसं झालेलं. पर्समधे होत्या-नव्हत्या त्या सगळ्या पिशव्या भरून हावरटासारखी भाजीच भाजी घेतली. हातात लळत-लोंबत पिशव्या आणि डोक्यात 'आता काय बरं करू जेवायला?'

मग रस्ता बदलून संध्याकाळींचा पॅटर्न ठरूनच गेला. घरात कसली पिठं-मिठं आहेत ते नीट पाहायची सवय लागली. जिरं संपलंय, आठाच्या आत गेलं तर कोपर्यावर ताजं डोसा बॅटर मिळतं, फ्रीजमधली कोथिंबीर पिवळी पडायला लागलीय, गूळ चिरला तर सोईचं होईल का, असल्या नोंदी डोक्यात आपसूक होत गेल्या. घरी गेल्यावर तसं फार श्रमाचं -वाटणाघाटणाचं-नवलपरीचं काही करायचं त्राण नसेच. नसतंच. पण 'मरू दे, एक वडासांबार खाऊ नि कॉफी ढोसू की झालं'प्रकारचा माझा निरुत्साह ओसरून गेला. जे काही करायचं ते झटपट होणारं नि सोपं तर हवंच, पण भाज्या असलेलं-कमी तेलाचं-चविष्ट हवं असा आग्रह आला त्या जागी. आठवड्यात एकदा तरी उसळ, एक तरी पालेभाजी नि ऑलमोस्ट रोज कोशिंबीर करायचीच असं ठरून गेलं. मग वाणसामानही मीच बघून आणायला सुरुवात केली. या खेपेला भुईमुगाचं तेल घेतलं, तर पुढच्या खेपेला ठरवून सूर्यफुलाचं. ताजं नाचणीचं पीठ मिळालं की लगेच घेऊन ठेवायचं. मग कधी मिळेल त्याची शाश्वती नाही. साबुदाणा एकसारख्या रंगाचा असला तरच खिचडीत गंमत. रवा अगदी जिवापाड बारीक असला की उपम्याचा सत्यानाश होतो. घराजवळच्या सुपरमार्केटात मटकी सटीसहामाशी कधीतरीच मिळते. न कंटाळता चौकशी करत राहायचं.

सुगरणींना डाव्या हाताचा मळ वाटणारी, पण माझ्याकरता भलतीच गंमतशीर असलेली ऍडव्हेंचर्सपण केली. मटकीला मोड आणले (पहिल्या फटक्यात!), दुधाला विरजण लावलं (दोनदा दूध नुसतंच फाटून फुकट गेलं. :(), तव्याला चिकटणार्या धिरड्यांच्या पिठात थोडा रवा घालून धिरडी यशस्वी केली. काही काही सपशेल फसलेले प्रयोग, काही अपघाती यश, थोडी नासधूस, पण खूप सारी धमाल.

इतके दिवस फसलेले बेत लिहिले, आता थोडे यशस्वी झालेले. हे बेत नुसतेच 'बोलाची कढी-'छापाचे नव्हेत. खरंच करून बघितलेले.

डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

साहित्य:

साधारण तीन माणसांना जेवायला पुरेलश्या हिशेबानं -

पालकाची जुडी (निवडायला सोप्पी!)

लसणीच्या सताठ पाकळ्या

एक टोमॅटो चिरून

एक हिरवी मिरची

कढीलिंबाची चार पानं

अर्धी-पाऊण वाटी तूरडाळ

फोडणीचं साहित्य नि चमचाभर मालवणी मसाला (नसला तर लाल तिखट चालतं.)

दीड वाटी तांदूळ भातासाठी.

दोन लहान काकड्या.

वाटीभर दही.

कोथिंबिरीच्या चार काड्या.

डाळ-तांदुळाचा कुकर लावताना, पालक निवडून-धुऊन-बारीक चिरून घ्यायचा आणि डाळीतच घालायचा. हिरवी मिरचीपण एक उभी चीर देऊन, देठ काढून डाळीतच घालायची. वास मस्त लागतो तिचा डाळीला.

कुकर झाला, की भात तसाच गरम राहायला ठेवून द्यायचा नि डाळ-पालक काढून रवीनं घुसळून किंवा पळीनं घाटून घ्यायचा. जिरं-मोहरीची फोडणी करून त्यात लसणीच्या पाकळ्या चांगल्या लालसर करून घ्यायच्या. मग कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून परतून घ्यायचा. मग मसाला किंवा तिखट. त्याला तेल सुटलं, की डाळ-पालकाचं ते गरगट घालायचं. मीठ घालून आपल्याला हवं तितपत दाटसर होईपर्यंत थोडं पाणी घालून उकळायचं. डाळ-पालक तयार. (शेजारच्या काकींनी ही भाजी / आमटी केली की, आमच्या बाल्कनीपर्यंत दरवळ येई आणि मी कासावीस होत असे. त्यांच्याकडून पाकृ यथासांग शिकून झाली, आईच्या समोर उभं राहून करवून घेऊन झाली, तरी रामा शिवा गोविंदा! तशी चव काही केल्या येत नसे! कशी येणार? त्यांच्याकडचं तिखट म्हणजे मालवणी मसाला. आणि आमच्या ब्राम्हणी मिसळणात नुसतंच लाल तिखट! शेवटी बिचार्या भाजी केली न चुकता मला वाटीभर आणून द्यायला लागल्या. हल्ली मी या उसनवारीची मजल थेट मसाल्यापर्यंत मारून त्यांच्याच चवीची भाजी करायला लागले आहे.)

ही भाजी मला थोडी मसालेदार आवडते. पण काही जणांना नेमका तोच मसाल्याचा वास नडू शकतो. त्यांनी नुसतं लाल तिखट किंवा तेही वगळून नुसतंच हिरव्या मिरचीच्या वासावर भागवलं तरी भाजी चांगली लागते. हवं तर फोडणीत आल्याचं पातळ काप घालायचे. त्याचाही मस्त वास येतो.

काकडीची कोशिंबीर तर अगदीच सोपी. काकडी चिरून घ्यायची नि मिरचीचा एखादा तुकडा जाडा-जाडा चिरून घालायचा (काढायला सोपा). मीठ नि चिमटीभर हिंग लावून दहा मिनिटं ठेवायचं नि मग पिळून पाणी काढून टाकायचं. (या पाण्यात थोडं ताक मिसळून किंवा न मिसळताही नुसतंच प्यायला मला खूप आवडतं.) मग अगदी आयत्या वेळी दही आणि चिमटीभर साखर मिसळायची. वरून कोथिंबीर बारीक चिरून घालायची.

वाफाळलेला भात (डाएट करत नसलात तर वरून तूप. :(), उकळता डाळ-पालक आणि काकडीची कोशिंबीर.

सर्वांगसुंदर! :)

Comments

Snehal Nagori said…
parawach aaloo palak kela hota me
baki kruti hich pan dal ani tometo n ghalta
dahi kinwa takala besanch peeth laun palakala ukali aali ki tyat ghalaych ani arthat diet dhabyawar baswun batatyache tukde chan kharpus talun tyat sodaych masta lagta!!!
Anonymous said…
असं होतं.. माझं लग्न झालं होतं तेंव्हा (२२ वर्षापुर्वी) केक केला होता एगलेस. जमला नाही , म्हणुन त्याचे शंकरपाळे करुन ठेवले होते. आणि मला पण सांगितलं नव्हतं कित्येक दिवस.. शंकरपाळ्यांना मस्त चव आलेली होती.. (य़ेणारंच ना! मिल्क मेड + बटर जे घातलं होतं) मस्त लिहिलंय.. असंच लिहित जा.. मनापासुन , आपल्याला जे आवडेल ते..

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे