मिसळपावमोठ्ठ्या ब्रेकनंतर काही अपडेट्सः


१. क्ष ला काही विशिष्ट व्यक्तिविशेषांमधे असाधारण रुची निर्माण झाल्यामुळे तो भल्या पहाटे उठून ब्रेकफास्टकरिताही एक विशिष्ट हाटेल गाठू लागला आहे. त्यामुळे आमच्या स्वैपाघरातला त्याचा सक्रिय / निष्क्रिय सहभाग जवळपास बंद झाल्यात जमा आहे.


२. स्वैपाघरातील दिने दिने धाडसी प्रयोगांचा आम्हांला (अर्थात! आत्मवाचक आदरार्थी बहुवचन.) वीट आल्यामुळे आम्ही चक्क एक 'कुकबुवा' बाळगला आहे. त्याचं नाव र. (नुकताच लॉण्ड्रीतून आलेला हातरुमाल पोळ्या शेकायला घेणे व तो हातासरशी थोडासा जाळून ठेवणे, महिन्याकाठी निदान तीन तरी दांड्या मारणे, सांगितल्यापैकी अर्धाच स्वयंपाक करून कुणाचे लक्ष नाहीसे पाहून साळसूदपणे पसार होणे, कुठलीही भाजी असो - त्यात एक कांदा, बरीचशी धनिया पावडर व एखादा तरी टमाटू जिरवणे (अत्यंत तुच्छ स्वरात - टमाटर हेल्थके लिये अच्छा होता मॅडम...), उशिरा उगवल्यावर व पैसे उसने मागताना अनन्यसाधारण गोड हसून दाखवणे, अशा अनेक लीला तो लीलया करतो. पण त्याबद्दल सविस्तर परत कधीतरी. तूर्तास नुसताच पात्रपरिचय.)


३. र येऊ लागल्यानंतर सुमारे आठ दिवसांतच मी, अ आणि ब यांची पोटं आळीपाळीने बिघडली. र च्या पाककौशल्याला दोष देण्याआधीच संध्याकाळी आयत्या चहाकरता टपकलेल्या क्ष नं 'तुम्हांला घरातलं जेवण सोसत नाहीय वाट्टं' असं निरागस आवाजातलं भाष्यवजा पिल्लू सोडल्यामुळे आम्हांला आत्मपरीक्षण करणं भाग पडलं. आता सार्‍यांच्या तब्ब्येती ठीक आहेत.


अपडेट्स संपले. पदार्थ सुरू -


मी मिसळ फर्मास करते. (प्रतिक्रियांचा धुरळा विरला असल्यास पुढे जाऊ.) अ ची आई आली होती. (बरोबर. चितळ्यांच्या बाकरवड्या आणणारी. तीच ती.) तिच्यासमोर माझ्या मिसळीचं अतोनात गुणवर्णन करून झालं. अखेरीस माझ्या आळसासमोर प्रतिष्ठेचा प्रश्न जिंकला आणि र ला सुट्टी देण्यात आली. कुणाच्या तरी आईला - साक्षात आईला - माझ्याकडून माझ्या रेसिपीचे धडे घ्यायचे असल्यामुळे मी एक्सायटेड + नर्व्हस + फुशारलेली अशी होते. त्याच उत्साहात मी स्वत: बाजारहाट करून सामग्री घेऊन आले. ती येणेप्रमाणे -


आरोग्यपूर्ण व्हीट ब्रेड (इलाज नव्हता. इथे सहजासहजी आपला चविष्ट लादीपाव मिळत नाही. मिळालाच तर तो शिळा / गोडूस / भुसभुशीत असतो),


फरसाणाऐवजी हल्दीरामच्या आलू भुजिया (इथल्या फरसाणात मक्याचा गोड चिवडा घुसडतात. आणि शेव कैच्याकैच जाडजूड असते),


दही (मला मिसळीत दही आवडत नाही. गैरसमज नको. पण काहीकाही जणांना मिसळीचा सत्यानाश केलेला आवडतो. आता आपण तरी कुठवर पुरे पडणार? खा बापडे दही मिसळ),


मोड आलेलं कडधान्य (हे मी वाचकांच्या सोईकरता लिहिलेलं असलं, तरी मला मिळालं नाही. भरोश्याच्या भाजीवाल्याकडे पावटे, कुळीथ आणि वाल ही तीन कडधान्यं होती. त्याची मिसळ करण्यापेक्षा ’दगडाचा रस्सा’च्या चालीवर ’बिनकडधान्याची मिसळ’ करायचं ठरवून मी काढता पाय घेतला).


बाकीच्या गोष्टी घरात होत्याच.


आता साधारण दृश्यवर्णन हे असं -


आमच्या ३ बाय ६ च्या प्रशस्त स्वैपाघरात (फ्रीज, ओटा आणि सिंक त्यातच. आम्ही कन्नड लोकांसारखा हॉलमधे फ्रीज मांडलेला नाही यादी नोंद घ्यावी.) सफाईदारपणे कांदा बाऽऽऽऽऽऽरीक चिरणारी मी. ब स्वैपाघराच्या दाराशी घोटाळत अंदाज घेणारी. अ टीव्हीसमोर बसून उकडलेले बटाटे सोलत असलेली. अ ची आई लसूण सोलून खलबत्त्यात आलेलसणीची पेस्ट करून देणारी. आता मिसळ खायची या विचारानं प्रफुल्लित झालेले आमचे सगळ्यांचेच चेहरे.


इतक्यात पहिली माशी शिंकली. आत्मविश्वासानं फ्रीज उघडून टोमॅटो काढायला गेलेल्या मला भाजीचा नुसताच रिकामा ट्रे दिसला.


हे काय काकू? टोमॅटो संपलेत?


होय ग होय! कालच नै का आपण सार केलं? तरी कमीच पडले मला साराला टोमॅटो. नै का ग अ?


अ ’बालिका वधू’मधे रममाण झालेली. तिला सोईस्करपणे काहीच ऐकू येत नव्हतं.


असू दे. (चिडचिड लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत.)


ए ब, प्लीज एक काम कर ना ग. (आवाज वरवर मस्का लावणारा मिठ्ठास. पण चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यास ’बघ बाई ब, आपल्याला सगळ्यांनाच खायचीय मिसळ’ ही गर्भित धमकी.)


पटकन खालनं टोमॅटो दे नं आणून. (निखळ आदेश.)


टोमॅटो येईस्तोवर मी यथाशक्ती माझं ज्ञान पाजळलं. हो, अ च्या आईच्या नजरेतला आदर मला गमवायचा नव्हता.


कढीपत्ता लागतो मला ताजा.


आलेलसणीची पेस्ट तर घालतेच मी भरपूर. शिवाय लसणीच्या चारसहा पाकळ्या ठेचून घालते फोडणीत. मस्त लागतात.


फोडणीत थोडी चिमटीभर साखर घालायची. म्हंजे मग सही तवंग येतो.


मालवण मसाला मेन. त्याचीच तर तरीला चव येते.


तरीला दाटपणा यावा म्हणून तांदळाची पिठी लावते मी चमचाभर. हो हो, थंड पाण्यात विरघळवून. कॉर्नफ्लॉवर लावतो नं आपण सूपला, तसंच.


अ ची आई चतुर्मासाची कहाणी ऐकावी तशी मनोभावे ऐकत असलेली.


टोमॅटो आले. फोडणी. साखर. कढीपत्ता. लसणीच्या पाकळ्या. आलेलसूण पेस्ट. कांदा-टोमॅटो. मालवण मसाला. मिश्रणाला तेल सुटून घरभर पसरलेला दरवळ. रसमवाला एखादा अण्णा ’कौनसा मसाला अम्मा?’ असं विचारत येतो का काय, असा गर्वभरित संशय मला आलेला. आता वाफवलेलं कडधान्य घालून एक वाफ काढायची. (दुसरी माशी. कडधान्य नाही. पण मी हार मानली नाही. माझ्याकडे व्हर्च्युअल कडधान्य असल्यामुळे मी इथे एक उकडलेला बटाटा चिरडून वापरला.) चव बघून थोडं लाल तिखट. मीठ. एकीकडे अ ला कांदा-कोथिंबीर-लिंबू चिरायला बसवत मी पानं मांडायला घेतली.


रटरटणार्‍या मिश्रणात चांगलं तीन फुलपात्रं पाणी ओतलं आणि उकळी येण्याची वाट बघत आतून तांदळाची पिठी काढली.
पाण्यात विरघळवलेली पिठी उकळी आलेल्या रश्श्यात ओतली मात्र -


रस्सा फसफसून वर आला.


सेकंदभर मला काही कळेचना. प्रसंग ओळखून अ, ब आणि अ ची आई तत्परतेनं माझ्या भोवती जमा झालेल्या होत्या हे सांगायला नकोच. प्रकरण आता कढईतून उतू जात होतं. शिवाय त्याला एक चमत्कारिक वासही मारत होता. धक्क्यातून सावरून थोडं संशोधन केल्यावर असं लक्षात आलं, की र नं तांदळाच्या पिठीच्या जागी खायच्या सोड्याची पुडी बेमालूमपणे ठेवलेली होती. आणि माझा निष्कारण बळी गेला होता.


पिठी आणि सोडा यांच्या टेक्श्चरमधे काही फरक असतो की नाही, ते विरघळलं नाही धड तेव्हा कळलं नाही का तुला इत्यादी मुक्ताफळं उधळली गेलीच. पण उत्तररामायणात गुंतण्यात काही फारसा अर्थ नाही.


ते प्रकरण ओतून टाकून त्या दिवशी आम्ही कामतांना राजाश्रय दिला.


शिवाय आपण असं प्रांतवादी संकुचित राहूनही चालत नाहीच नं. बंगळुरी आल्यावर आपल्याच पद्धतीचं खायचं, तर रसम कधी खाऊन बघणार? इथेच आपल्या मराठी माणसांचं चुकतं. अ च्या आईलाही ते पटलं. तिला कामतांकडचं जेवण खूपच आवडलं. तिच्याकरता लिहून दिलेली ही मिसळीची पाककृती आणि एका जुन्या यशस्वी मिसळीचा एक फोटो -भरपूर तेलाची (जेवढं भाजीला घ्यावंसं वाटेल, त्याच्या दुप्पट तेल घ्यायचं. बरोब्बर होतं.) फोडणी करायची. नेहमीचीच. मोहरी, हिंग, हळद, थोडं लाल तिखट. त्यात कढीपत्ता, ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा साखर घालून परतून घ्यायचं. मग आलेलसणीची पेस्ट सढळ हस्ते. तिचा वास नाक्यापर्यंत पोचला, की मग बारीक चिरलेले कांदा-टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यात दीडेक चमचा मालवणी मसाला. तोही नीट परतला गेला, की मग वाफवलेलं कडधान्य. वाटाणे, मूग किंवा मटकी. ते नीट झालं की अंदाजे पाणी ओतून उकळी आणायची आणि मग तिखट-मीठ घालून तांदळाची पिठी (!!!) लावायची. तर्री तयार. मग उकडून मीठ लावून कुस्करलेल्या बटाट्याच्या फोडी, त्यावर कच्चा बारीक चिरलेला कांदा. त्यावर आपापल्या वकुबाप्रमाणे रस्सा + तवंग. वरून आलू भुजिया किंवा फरसाण. कोथिंबीर आणि लिंबाची फोड.

हाणा.

Comments

a Sane man said…
फर्मास....:):)

बंगरूळात लादी पाव मिळत नाही??? :(
Snehal Nagori said…
@ sane man,

ajeebat nahi bhangar god bakwas pav miltat!!!

@ meghana,

khaycha soda??? bichare A, ani b!!!
mazi tyanna sahanubhuti ahe... kasa sahan karat astil he aatyachar??
हा हा. पाककृती झकास आहे.
saanasi said…
माझाही एक अत्यंत आवडता प्रकार म्हणजे 'मिसळ'.
नाका-तोंडातून पाणी आणि कानातून धूर यायला हवा.
एकदा नुसती,एकदा दही घालून,परत नुसती,परत दही घालून अशा क्रमाने आपलं पोट भरेपर्यंत किंवा मिसळ संपेपर्यंत..जे काही आधी घडेल ते.
shinu said…
काय भन्नाट जमलंय. आई शप्पथ. पोस्ट वाचता वाचता तोंडाला पाणी सुटत होतच तोवर सगळा विचका झाला.(मिसळ उतू गेली नां)असो. ईश्वर तुअमच्या फ़सले (पक्शी फ़सफ़सलेल्या)मिसळिला गती देवो.
IOPINIONMAKER said…
मस्तच. तोंडाला पाणी सुटण्याइतपत झकास..
IOPINIONMAKER said…
झकास... तोंडाला पाणी सुटण्याइतके झकास....
do said…
HAHAHA badhiya :D

Popular posts from this blog

पोहे आणि मी

पोळ्या - एक अर्वाचीन छळ