श्रीखंड यहीं बनाएँगे

वास्तविक गोड पदार्थांमध्ये मला सर्वांत जास्त कुठला पदार्थ आवडतो, हा एक यक्षप्रश्न आहे. म्हणजे मला गूळतूप ते रसमलाई, बर्फी ते मोदक (काजू मोदक वगळून! तो प्रकार माझ्या डोक्यात जातो.), फणसपोळी ते पुरणपोळी सर्व तितकेच प्रिय आहेत. त्यामुळे ह्या पदार्थाबद्दल लिहिताना त्याला नेमकं काय विशेषण द्यावं मला कळेना. म्हणजे "हा की नई माझा सर्वांत आवडता गोड पदार्थ आहे", असं काही गोऽड मला म्हणवेना. त्याहून काही कडू म्हणणं यथोचित होईना. नि उगीच काहीतरी म्हणावं असं काहीही सुचेना. म्हणजे थोडक्यात लेखाची काहीही रूढार्थाने आकर्षक, पुणेरी नियमांत बसणारी विनोदी किंवा अगदीच नवनीत निवडक निबंधछाप अशी प्रस्तावना म्हणून खरडायची चार वाक्य काही केल्या सुचेनात. त्यामुळे अशा रडकुंडीला आलेल्या क्षणी मला ह्या पदार्थाचं "दाटून कंठ येता" असं एक समर्पक वर्णन तेवढं सुचलं. आता ह्या मिस्टर कॉन्टिनेन्टल पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास तो घशाशी येतो, हा काही त्या पदार्थाचा अवगुण नव्हे. त्याला तसे मिट्ट गोड बनविणार्‍यांचा त्यात दोष आहे. पण म्हणून अगदीच जड हाताने साखर घालणे हा काही त्यावर उपाय नव्हे. किंबहुना तो त्याचा अपमान आहे. असं अचूक प्रमाणात साखर असलेलं श्रीखंड जमलं म्हणून मला झालेला आनंद भीषण होता. ते कसं जमलं हे मला माहित नाही. पण कसं जमलं असू शकतं ते सांगायला काय हरकत आहे? (तशीही ह्या ब्लॉगवर काय लिहावं ह्यावर मेघना सोडून इतर कुणी हरकत घ्यायचा प्रश्नच कुठे येतो? पण ते असो.)

खरं तर अमेरिकेत येऊन कित्येक दिवस मला कुठल्याही देसी दुकानात आयतं श्रीखंड काही दिसेना. हे अगदीच अनाकलनीय होतं. त्यामुळे न्यूयॉर्कच्या सर्वणा भवनमध्ये सर्वप्रथम मेनुकार्डवर श्रीखंड दिसताच मी त्यावर तुटून पडलो होतो. त्यावेळी त्याच्या मालकाला खोटे विसा मिळवून माणसांची वाहतूक करण्याच्या प्रकरणी पकडलं नव्हतं. असेल तरी मला माहित नव्हतं. हे वेळीच सांगितलेलं बरं, नाही म्हणजे कसं की, म्हंजे असं की, तर म्हंजे...आम्ही नाही ब्वा ते...तर तेही असोच. कुठेच मिळेना त्यामुळे हा पदार्थ घरीच करण्याचा माझा अनेक दिवस बेत होता. पण नकटीच्या लग्नाहून अधिक विघ्नं वाटा अडविण्यासाठी उभी. सुरुवात "जमेल का आपल्याला?" इथपासून. "हात्तिचा! त्यात काय न जमायला झालंय? चक्का घ्यायचा किंवा दही बांधून चक्का करायचा नि मग साखर घालून वर वेलची वगैरे सजावट. झालं!". बरं. मग चक्का कुठे मिळतोय मरायला त्यामुळे मग बाजारच्या दह्याचं येतं का करता, हा पुढचा प्रश्न. येत असावं बहुदा असा एक सूर. मग कुठलं दही वापरावं, ह्यावरून काही परिसंवाद. बरं एक दही म्हणून काही मिळत असतं तर सोपं होतं. पण प्लेन दही, व॓निला फ्लेवरचं दही, मग त्यात परत नो फ॓ट, लो फ॓ट, होल मिल्क नि काय नि काय. मग पुन्हा अमेरिकन दुकानातलं दही नि पटेल ब्रदर्स मधला महानंदाच्या दह्याचा बुधला (हा महानंदाच्या दह्याचा डबा खरंच बुधल्याएवढा असतो, थोडी अतिशयोक्ती वगळता.) तर अमेरिकन होल मिल्क दही किंवा महानंदाचं सायटं दही हे ठरलं. आता दही व साखर एवढंच मुद्दल हवं होतं. ते जमलं.

पण मूळ प्रश्न तो नव्हताच. आता ह्या दह्याचा चक्का कसा होणार? आता हे दही बांधणार कशात? बरीच शोधाशोध केल्यावर खादीचे मोठ्ठे हातरूमाल, खादीचे पंचे सापडले. आता वास्तविक एकदा त्यात दही महफ़ूज़ केलं की ती खादीची वस्त्रं इतर वापरास निरुपयोगी ठरू शकण्याचा संभाव्य धोका होता. परंतु श्रीखंडासाठी तेवढं माफ होतं. त्यामुळे त्या समर्पणासाठी काही विशेष कठोर व्हावं लागलं नाही. पण हे सगळं प्रकरण बांधायचं कुठे, हा प्रश्न काही सुटेना. नि अमेरिकन फ्ल॓टमधल्या अतिआटोपशीर स्वयंपाकघराचा, त्यातल्या कुचकामी फर्निचरचा नि एकंदरीत रचनेचा राग नव्याने आला. म्हणजे जिथे हे प्रकरण टांगता येईल अशी एकही जागा दिसेना. आत शिरल्यावर डावीकडे पहावं तर एक फडताळांची रांग. त्याच्यासमोर एका कोपर्‍यात फ्रिज. त्याच्याच रांगेत ग॓स नि सिंक. नि हे सोडून जे उरेल तिथे असलेलं सनमायका लावलेलं सपाट लाकूड म्हणजे ओटा. नि त्याच्या वर नि खाली पुन्हा लाकडी कपाटांची, फडताळांची रांग. एक हूक नाही, एखादा बार नाही, सिंकच्या वर काही नाही. काही काही म्हणून नाही. भिंतीत असलेल्या एका खिळ्यावर कात्रीखेरीज काहीही टांगता येण्याची सोय नाही. सिंकच्या नळाला बांधण्याचा एक पर्याय होता. पण रात्रभर झुरळांसाठी असं खाद्य टांगून ठेवणं काही बरं वाटेना. म्हणजे आमचं स्वयंपाकघर आम्ही रात्री झुरळांसाठी मोकळं करून राखून ठेवतो. रात्री ते, दिवसा आम्ही, असं चोख जागावाटप आहे. नि त्यांच्या पालनपोषणासाठी म्हणून काही रूममेट्स खरकटी भांडी, खरकटं असं सगळं त्याच्यासाठी खास रचून ठेवतात. मग स्वयंपाकघराचा असा एकही भाग नसतो की जिथे ही झुरळांची फौज रात्रभर विहार करीत नाही. आता ह्या भानगडीत ते दही कुठे टांगणार? शेवटी घरातले इतर भाग चाचपडून झाले. पण नाही. अशक्य. कुठे काही टांगायची सोय नाही. शेवटी बाथरूम मधल्या शॉवरच्या पडद्याची दांडी ही एवढी एकच सुयोग्य जागा सापडल्यावर मी माझा उत्साह आवरता घेतला. श्रीखंडाचा योग नाही, अशी मनाची अत्यंत जड अंतःकरणाने समजूत घातली.

कालांतराने पटेल ब्रदर्समध्ये श्रीखंड मिळतं असा एक शोध लागला. साहजिकच ते विकत आणलं. पण केवळ पिस्ते दाताखाली आले म्हणुन केशरपिस्ता म्हणायला, वेलची लागली म्हणून इलायची म्हणायला नि "कैरीनो ताजो रस" म्हणून मिरवणार्‍या पिशव्यांतला पपईचा आमरस नावाला दिसतोय म्हणून आम्रखंड म्हणायला माझी जीभ धजावेना. शिवाय साखर भारतीय प्रमाण घेऊन अमेरिकेत मिळणारी घालतात काय असा एक प्रश्न पडला. भारतीय साखर जेवढी घालाल त्याच्या किमान दुप्पट अमेरिकन साखर ओतल्याशिवाय पदार्थ गोड होत नाही, हे त्यांना कुणीतरी सांगणं फार फार गरजेचं आहे. त्या प्रकरणाचे सर्व उपलब्ध फ्लेवर खाऊन शेवटी मी हात टेकले नि कुठल्याही परिस्थितीत "श्रीखंड यहीं बनाएँगे" असा निर्धार केला.

पुन्हा एकदा सर्जनशीलता परजली नि एका कुठल्याशा क्षणी दही बांधण्याची एक नामी युक्ती सुचली. मग सुयोग्य मुहूर्त शोधताना १५ आ॓गस्ट जवळच असल्याचा साक्षात्कार झाला. १५ आ॓गस्टचे औचित्य साधून श्रीखंड पुरी असा बेत करण्याची इच्छा जनमानसांत व्यक्त केली. परंतु दिवाळीला करंज्या करूयात, ह्याला मिळालेल्या प्रतिसादाएवढा काही उदंड प्रतिसाद १५ आ॓गस्टला मिळेना. म्हणजे ह्याही दिवशी काही गोडधोड करावं अशी संकल्पना त्यांच्यात नसावी बहुदा. वास्तविक एकदा त्या सर्व जनांचे पासपोर्ट तपासून पहावं असं मला वाटत होतं. पण म्हटलं असो, असतील एकेकाच्या पद्धती. शिवाय आपल्याकडे काही ज्यांनी राष्ट्राप्रति निष्ठा मोजता येते अशा सावरकरवादी फूटपट्ट्या नसल्यामुळे म्हटलं राहूच देत, आपल्याला काही ते जमायचं नाही. पण लागूनच एका मित्राचा वाढदिवस असल्याचं कळलं. त्यामुळे मी १५ आ॓गस्ट व त्याचा वाढदिवस असा मौका साधला. ह्याला प्रतिसाद दांडगा मिळाला. पण त्यामुळे मला नेमकं किती दही लागणार ह्याचा अंदाज येईना. वर मातोश्रींचा सल्ला "खूप लागेल. पाणी गेल्यावर ते दही आहे त्याच्या निम्मं पण राहणार नाही. एका दह्याच्या डब्यात फार फार तर दोन जणांना पुरेल एवढं होईल." झाली पंचाईत. आता एवढ्या जनतेला पुरेल एवढं श्रीखंड करायला किती दही लागेल? त्या त्रैराशिकाने मी जरा गांगरलो. म्हणजे घरात असलेले बरेच दह्याचे डबे मी ह्या प्रकारात संपविणार होतो. पण आता म्हणजे विकत आणावं लागणार. मग शेवटी साधारण एक महानंदाचा बुधला नि चार एक अमेरिकन दह्याचे डबे असा साधारण सहा किलो दह्याचा ऐवज जमवला. साखर, वेलची, जायफळ जमवलं. केशर होतं ते शोधून ठेवलं.

१४ आ॓गस्टची रात्र. जेवणं झाल्यावर लोक झोपू लागले असताना रान जरा मोकळं झालेलं पाहून मी हळूहळू साहित्य जुळवू लागलो. प्रथम एक कचर्‍याची पिशवी (अर्थात न वापरलेली) कारपेटवर अंथरली. तिच्यावर दोन खुर्च्या एकमेकींकडे पाठ करून ठेवल्या. त्यांच्या मधोमध एक बेताचं पातेलं ठेवलं. जनता हे सर्व तिरक्या नजरेने पाहत होती. त्या खुर्च्यांच्या पाठींना असलेली मोठी भोकं मी पूर्वीच हेरून ठेवली होती. त्यानंतर पंच्यात दही कोंबलं नि करकचून गाठ मारली व पिळून जमेल तेवढं पाणी काढून टाकलं. हा सोहळा मात्र जनता अपार कुतूहलाने पाहत होती. पण जेव्हा मी स्वयंपाकघरातून लाटणं बाहेर घेऊन आलो, तेव्हा सगळे चपापले. हे काहीतरी अजबच होत होतं. मी निमूट ते दह्याचं गाठोडं लाटण्याला अडकवलं नि ते लाटणं दोन्ही खुर्च्यांच्या पाठीतून आरपार खुपसलं. पाणी पातेल्यातच गळतंय नि कारपेट कोरडंठाक आहे, ह्याची शहानिशा केली. असंच अजून एक हातरुमालाचं गाठोडं बांधलं. त्याकडे पाहून सद्दाम हुसेनला फासावर जाताना पाहून बुशला जितका आसुरी आनंद झाला असेल, त्याहून अधिक आत्मिक आनंदाने तृप्त होऊन सुखाने झोपलो.

सकाळी उठलो. तर युक्ती तरली होती. बरंच पाणी निघून होतं. उरलेलं मी अजून पिळून काढून टाकलं. ते निर्जल दही जेव्हा वस्त्रांपासून अलग केलं तेव्हा एक मुलायम, मऊसर, पाण्याचा लवलेश नसलेलं पांढरंशुभ्र प्रकरण भांड्यात साखरेची वाट पाहत होतं. महानंदाच्या सायट्या दह्याचा चक्का अधिक जमला होता ते जाता जाता केलेलं एक निरीक्षण. शेवटी आडात असावंच लागतं! सढळ हस्ते साखर टाकली. साधारण जेवढं दही उरलं होतं तितकीच. नेमकी किती ते विचारू नका. साखर घाला, ढवळा, चव घ्या. हे सगळं ते गोड होईस्तोवर. इतकं गोड की त्या क्षणी अगोड लागता कामा नये नि काही तासांनी साखर विरघळल्यावर ते मिट्ट गोड लागता कामा नये. हयाचं नेमकं माप कसं सांगणार? पण ते झक्कास जमलं खरं. त्यावर वेलची जायफळ पूड पसरून एकत्र केली. नि सगळं प्रकरण फ्रिजमध्ये संध्याकाळपर्यंत ठेवून दिलं. संध्याकाळी मित्राने थोडं केशर दुधात एकत्र करून त्यात घातलं नि ढवळलं. तोवर पुर्‍या होतच होत्या. बटाट्याची भाजीही तयार होती. हॉटेलमधून मागवलेली बिर्याणी अ॓ल्युमिनिअममधून आली होती नि कैरीनो ताजो रसचा डबा एका भांड्यात "श्रीखंड कमी पडलं तर असू देत" म्हणून उपडा झाला होता. ते कमी पडलं नाहीच. नि त्यापुढे त्या दारच्या आमरसाला कुणी शिवलंही नाही, हे वेगळं सांगायला नकोच!



ता.क. खादीचा हातरुमाल धुवून त्याचा पुनर्वापर होत आहे. त्याची हातरुमाल म्हणून वापरायची लायकी धुवूनही उरली नव्हतीच. हल्ली त्यात भिजलेली कडधान्यं मोड आणण्यासाठी बांधून ठेवतो!

Comments

kya bat! saheech phoTuu! :)
te arpar latana ghusavalelya avasthetala pan ghyayacha na!
Snehal Nagori said…
khoop ushira taktey reply... pan sahich zalay he!!
Nandan said…
Kya baat hai! Maryland la chakkar marali pahije rao aata :)
a Sane man said…
@यशोधरा,
धन्यवाद. एवढं कुठे मला लक्षात रहायला की कधीकाळी आपण ह्यावर लिहू, तर फोटो काढून ठेवावा. हा फोटोसुद्धा जनता जेवायला आली असल्याने कुणीतरी उत्साहात काढलाय! :)

@स्नेहल,

थांकू! :-)

@नंदन,

जरूर, केव्हाही! :)
saanasi said…
शीर्षक फारच आवडलं.
तुम्ही केलेल्या श्रीखंडाइतकाच अप्रतिम लेख!
pktkb said…
i had absolute fun reading it! cool very cool!
Ram said…
ethe madhe madhe koni mulane ha lekh lihila aahe kay ?

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या