Posts

Showing posts from 2009

पोहे आणि मी

रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता? बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर भरत नाहीच. शिवाय पित्ताला आमंत्रण. आणि खरं सांगायचं तर काही खाल्ल्याचं समाधानही मिळत नाही. अशा वेळी मी हमखास पोह्यांचा आश्रय घेते. पोहे पुरेश्या दुधात भिजवावेत. साय असल्यास उत्तम. त्यावर पोह्यांच्या साधारण एक द्वितीयांश तरी दही घालावं. चवीपुरतं मीठ आणि तवंगासकट फोडणीची मिरची / लसणीचं तिखट / तळलेली सांडगी मिरची किंवा मग चक्क लाल तिखट. चमच्यानं किंवा हातानं. आपापल्या मगदुरानुसार कालवावेत. आणि ओरपावेत. परब्रह्म. सकाळी सिंकमधे पडलेली खरकटी वाटी / कुंड्या / पातेलं बघून आईची दणदणीत हाक आलीच पाहिजे - जागलात वाटतं काल? उठा आता महाराणी... दहीपोहे हा निव्वळ रात्रीच्या उपाशी जागरणांशी असोसिएट केलेला पदार्थ नसून माझ्या बाबांच्या वात्सल्याशीही तो निगडीत आहे. बर्‍याचदा संध्याकाळी बाहेरून गिळून आल्यावर 'हॅ, मला नाहीये

डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या दिवसालाच कॅलरीजचा धाक. मशीनमधली कितवीतरी कॉफी घेतानाही 'साखरेचा क्यूब टाकू की नको' असा धाक आणि मोहाच्या सीमारेषेवरचा प्रश्न दर वेळी. सामोशाच्या काउंटरवरून अंमळ चिडचिड करतच स्वतःला फ्रुट बोलच्या नीरस-नॉन ग्लॅमरस पर्यायाकडे वळवणं. काळोख पसरायला लागायच्या वेळी ऐन रहदारीच्या रस्त्यावरून परतताना घराचं कुलूप काढण्यासाठी स्वतःला एनकरेज करत, वाटेवरच्या लायब्ररीचं लॉलिपॉप दाखवत दाखवत जाणं. 'अमेरिकन लेज्' आणि तत्सम इझी कम्फर्ट एस्केप्सच्या जाळ्यात सापडण्याची हीच नेमकी वेळ. त्या दिवशी मात्र चाळा म्हणून रस्ता थोडा बदलला तर भाजीवाल्यांची एक अलीबाबा-गुहाच समोर आल्यासारखी झाली. उच्चमध्यमवर्गीयांच्या वस्तीत असतात तसली मोनोपॉलीनं माजलेली, महागडी, ब्रोकोली + पालक + टोमॅटो + कोबी + फरसबी इतपतच माना टाकलेले पर्याय असले

मिसळपाव

Image
मोठ्ठ्या ब्रेकनंतर काही अपडेट्सः १. क्ष ला काही विशिष्ट व्यक्तिविशेषांमधे असाधारण रुची निर्माण झाल्यामुळे तो भल्या पहाटे उठून ब्रेकफास्टकरिताही एक विशिष्ट हाटेल गाठू लागला आहे. त्यामुळे आमच्या स्वैपाघरातला त्याचा सक्रिय / निष्क्रिय सहभाग जवळपास बंद झाल्यात जमा आहे. २. स्वैपाघरातील दिने दिने धाडसी प्रयोगांचा आम्हांला (अर्थात! आत्मवाचक आदरार्थी बहुवचन.) वीट आल्यामुळे आम्ही चक्क एक 'कुकबुवा' बाळगला आहे. त्याचं नाव र. (नुकताच लॉण्ड्रीतून आलेला हातरुमाल पोळ्या शेकायला घेणे व तो हातासरशी थोडासा जाळून ठेवणे, महिन्याकाठी निदान तीन तरी दांड्या मारणे, सांगितल्यापैकी अर्धाच स्वयंपाक करून कुणाचे लक्ष नाहीसे पाहून साळसूदपणे पसार होणे, कुठलीही भाजी असो - त्यात एक कांदा, बरीचशी धनिया पावडर व एखादा तरी टमाटू जिरवणे (अत्यंत तुच्छ स्वरात - टमाटर हेल्थके लिये अच्छा होता मॅडम...), उशिरा उगवल्यावर व पैसे उसने मागताना अनन्यसाधारण गोड हसून दाखवणे, अशा अनेक लीला तो लीलया करतो. पण त्याबद्दल सविस्तर परत कधीतरी. तूर्तास नुसताच पात्रपरिचय.) ३. र येऊ लागल्यानंतर सुमारे आठ दिवसांतच मी, अ आणि ब यांची पोटं आळ

श्रीखंड यहीं बनाएँगे

Image
वास्तविक गोड पदार्थांमध्ये मला सर्वांत जास्त कुठला पदार्थ आवडतो, हा एक यक्षप्रश्न आहे. म्हणजे मला गूळतूप ते रसमलाई, बर्फी ते मोदक (काजू मोदक वगळून! तो प्रकार माझ्या डोक्यात जातो.), फणसपोळी ते पुरणपोळी सर्व तितकेच प्रिय आहेत. त्यामुळे ह्या पदार्थाबद्दल लिहिताना त्याला नेमकं काय विशेषण द्यावं मला कळेना. म्हणजे "हा की नई माझा सर्वांत आवडता गोड पदार्थ आहे", असं काही गोऽड मला म्हणवेना. त्याहून काही कडू म्हणणं यथोचित होईना. नि उगीच काहीतरी म्हणावं असं काहीही सुचेना. म्हणजे थोडक्यात लेखाची काहीही रूढार्थाने आकर्षक, पुणेरी नियमांत बसणारी विनोदी किंवा अगदीच नवनीत निवडक निबंधछाप अशी प्रस्तावना म्हणून खरडायची चार वाक्य काही केल्या सुचेनात. त्यामुळे अशा रडकुंडीला आलेल्या क्षणी मला ह्या पदार्थाचं "दाटून कंठ येता" असं एक समर्पक वर्णन तेवढं सुचलं. आता ह्या मिस्टर कॉन्टिनेन्टल पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास तो घशाशी येतो, हा काही त्या पदार्थाचा अवगुण नव्हे. त्याला तसे मिट्ट गोड बनविणार्‍यांचा त्यात दोष आहे. पण म्हणून अगदीच जड हाताने साखर घालणे हा काही त्यावर उपाय नव्हे. किंबहुन