भाजणीच्या पोळ्या

पोळपाट-लाटणं हे स्वैपाघरातलं एक अत्यावश्यक आयुध मानलं जातं. पण सुदैवानं अ आणि मी दोघींनाही पोळ्या नावाच्या प्रकारात यत्किंचितही इंट्रेष्ट नव्हता - नाही. पोळी तव्यावर उलटली की त्यातल्या वाफेचा जो एक विशिष्ट वास येतो, त्यानं मला भरल्या पोटी मळमळूही शकतं - इतकी माझी नावड टोकाची आहे. अ लाही असंच वाटतं, हे कळल्यावर आपण योग्य रूममेटच्या घरात पडल्याचं माझ्या लक्षात आलं आणि सुमारे अडीच महिने कणीक नावाचा पदार्थ आम्ही दुरूनही पाहिलाही नाही. भाताचे विविध प्रायोगिक प्रकार, पोहे-उपमा-थालिपीठ ही त्रयी, कधीमधी उकड-मोकळ भाजणी-धिरडी (होय, होय, धि-र-डी. प्लीज डोण्ट अंडरएस्टिमेट मी, ओके?) आणि भाकर्या (विश्वास ठेवणं अवघड जात असलं तरीही, मला उत्तम भाकर्या करता येतात. हवं तर अ ला विचारून खात्री करून घ्या. मला कुचकामी ठरवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊन खोटं बोलू शकते. पण माझ्या हातची भाकरी खाऊन तिनं तीन महिन्यांच्या इडलीचा वनवास संपल्याची जी मुद्रा केली होती, ती ती स्वत:ही विसरलेली नाही. - शिवाय अजून तरी स्वैपाघर माझ्या हातात आहे, हे ती समजून आहे.) यांवर आमचं उत्तम चाललं होतं.

पण परमेश्वराला का कुठे असं पाहवतं?

अ चे आईबाबा आमची 'वेवस्था' पाहायला येण्याचं ठरलं आणि अ च्या आईचा फोन आला.

साधारण संभाषणाचा तजुर्मा येणेप्रमाणे:

आहे का सगळं स्वैपाघरात, की आणू काही भांडीकुंडी?

कशाला भांडी-बिंडी? चितळ्यांची बाकरवडी आण तितक्याच वजनाची न विसरता.

जळ्ळं लक्षण. पोळपाट घेतलात का?

अग, नाही लागत आम्हांला. ब्रेडचा शोध लागलाय की.

हो का? बाबांनापण पाव-भिस्कुटं खायला घालू का आठ दिवस?

चालेल. व्हीट ब्रेड मिळतो ना हल्ली.

निर्लज्ज आहे गधडी. मी घेऊन येते. घरात एक जास्तीचा आहे पोळपाट.

बरं. मला काय... आण. तुलाच ओझं होईल, म्हणून नको म्हणत होते. नाहीतरी तूच आणणार, तूच करणार... बाकरवडीचं विसरू नको हां.

काकूंनी फोन टेवला असावा. कारण अ खांदे उडवून परत लोळायला लागली.

तर अशाप्रकारे आमच्याकडे पोळपाट-लाटणं, कणीक भिजवण्यासाठी परात आणि कणकेसाठी एक मोठा डबा आला. सोबत काही झाकण्या (सगळं तस्सं उघडं-वाघडं टाकतात कार्ट्या-), एक नवीन चिमटा (हा चिमटा अगदी लापट आहे. थांब, मी चांगला बघून आणते-), तेलाचा कावळा (गधडे, बाटलीनं ओततात तेल तव्यावर? बाटली वितळली म्हणजे? - अग, वितळली होती एकदा. मग सॉलिड मजा यायची किचनमधे फिरताना-), किसणी (अगबाई, परवा चतुर्थी आहे की -) अशी काही पूरक खरेदी इथल्या दुकानदाराकडून झाली. माझ्या स्वैपाघरात इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या इकडे अशी बरीचशी निरर्थक आवराआवरी झाली. (आठ दिवस इकडची काडी तिकडे न करता आयतं खायला मिळण्याची ही किंमत अगदीच मामुली आहे.)
पाहुणे गेले. पोळपाट-लाटणं उरलं.
तरी आम्ही काही पोळ्या-बिळ्यांचं मनावर घेतलं नव्हतं. पण आमच्या घरात यथावकाश ब चा शिरकाव झाला. आणि रोज संध्याकाळी तिची - 'हे काय, आजपण भात?' अशी केविलवाणी पृच्छा सुरू झाली. (तिला यायला उशीर होत असल्यामुळे स्वतः काही करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिचा आवाज फक्त केविलवाणा होता हे सांगणे न लगे.) आणि मग - 'च्यायला, पोळ्या-पोळ्या आहे काय? मला भाकर्‍या येतात. पोळ्या न यायला झालंय काय?' असा दमदार आवाज काढून अखेरीस मी कणकेला हात लावला.
नंतर साधारण साडेतीन दिवस आम्ही तो पदार्थ पुरवून पुरवून खात होतो.
हळूहळू कणकेचं तंत्र जमलं. कणीक अर्धा तास आधी भिजवून ठेवली, तर पोळ्या मऊ होण्याची शक्यता निर्माण होते, हे लक्षात आलं. पोळ्या गोल दिसायला लागल्या. मधे पारदर्शक आणि कडेनं दुपटी, असं होण्याचं प्रमाण कमी झालं. 'तू तिकडून ओढ, मी इकडून ओढते' असं न करताही त्या तुटायला लागल्या. स्फुरण चढून मी घडीच्या पोळ्यांना हात घालण्याइतकी धाडसी झाले. नानसारखा आकार बदलून त्याही हळूहळू गोल व्हायला लागल्या. आणि एक दिवस -

अशा का दिसतायत पोळ्या? (बिचकत ब.)

अशा? अशा म्हणजे कशा? (अतोनात उर्मट स्वर. अर्थात माझा.)

न- नाही, म्हणजे जरा रंग वेगळा नाही वाटत? (अजूनच बिचकत.)

जराशी करपली असेल, काही नखरे करू नकोस.

नाही ग.. एकंदरीतच रंग - म्हणजे जरा चॉकलेटी वाटतेय. तू बघतेस का?

अं? चॉकलेटी? होय की ग. चवपण जरा निराळीच वाटतेय, नाही? (माझा आवाज नरमलेला.)

तशा खमंग लागतायत पण... (मधेच तोंड घालून अ. म्हटलं ना, तिला पोळ्या या प्रकरणाबद्दल अक्कल जरा कमीच.)

अशा प्रकारे 'भाजणीच्या पोळ्या' या नव्या प्रकाराचा शोध आम्ही (आत्मवाचक आदरार्थी बहुवचन. गैरसमज नको.) लावला.

ही पाककृती -

कणीक आणि भाजणी जेवढ्यास तेवढी घ्यायची. तेल, मीठ आणि पाणी घालून कणीक मळायची. हवा असल्यास थोडा ओवा (ओव्याला कन्नडमधे 'ओमम्' म्हणतात!) आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. (ही अर्थातच थर्ड व्हर्जनच्या वेळी केलेली ऍडिशन.) नेहमीसारख्या पोळ्या करायच्या. तूप सोडून भाजल्या, तर अप्रतिम लागतात. त्याच्याशी तोंडी लावायला भाजून लसणासोबत चुरडलेली मिरची आणि सायीचं दही. (हे काय तोंडीलावणं केलं आहेस? त्यात लोळावंसं वाटतंय, इतकं सेक्सी लागतंय . इति अ.)

उग्गीच नाही मी स्वतःला सर्जनशील म्हणवत.

Comments

a Sane man said…
ha ha pu va...lab madhe lok baghayla lagle...

interesting aahe paN he...esp. juni viri jaat aaleli bhajaNi sahaj khapel ya prakarat...yach weekend la juni bhajaNi samapvali pahije...dhanyawaad...

thalipeethasarakha thoDa haLad tikhat, dhane-jire pood Takin mhanato...karaN asala sexy tonDi lavaNa ithe nahi...far tar dahyat metkooT kalavin...karun pahilach pahije...
madhura said…
Sangalya lagatat?
shanka aahe.
Anamika Joshi said…
तिकडे 'टू फ्रेण्ड्स' नावाने ब्लोग लिहिणार्या मेघना ने हा ब्लोग लिहिला आहे? माझा नाहि विश्वास बसत. शक्यच नाही.
Tulip said…
अग मस्तच वाटलं वाचून.खुसखुशित झालाय ब्लॉग अगदी.दोन्ही पोस्ट्स एन्जॉय केली अगदी.
saanasi said…
पोळ्या प्रकरण तसं अटळ.
त्या गोल,पातळ,नीट भाजलेल्या,वगैरे वगैरे होईपर्यंत काही खैर नाही खाणार्‍यांची.

माझी पोळी अजून तरी खूप शालीन आहे. (जराही पदर सुटलेला नसतो तिचा!)

Popular posts from this blog

पोळ्या - एक अर्वाचीन छळ

फेण्या

श्रीखंड यहीं बनाएँगे